esakal | Hingoli : पाऊस, पुराचा शेतीला फटका
sakal

बोलून बातमी शोधा

Hingoli : पाऊस, पुराचा शेतीला फटका

Hingoli : पाऊस, पुराचा शेतीला फटका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यात मंगळवारी (ता.२८) झालेल्या संततधार पावसाने दोन लाख चार हजार २२४ हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाले आहे.जोरदार पावसामुळे कयाधू, पैनगंगा, आसना नद्यांना पूर आला. या व इतर नदीकाठावर असलेल्या शेतजमिनी खरवडून गेल्या. त्याशिवाय दोन लाख चार हजार २२४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

नदीच्या पुराचे परिणाम

कयाधू नदीच्या पुरामुळे हिंगोली तालुक्यातील समगा येथील नळकांडी पूल काल वाहून गेला. याच नदीपात्रात सोडेगाव (ता. कळमनुरी) येथील पुलावरून पाणी गेल्याने हा मार्ग बंद झाला होता. या मार्गावर वीस ते पंचवीस गावे येतात. शेवाळा गावात या नदीचे पाणी शिरले होते. याच नदीवर डोंगरगाव पूल येथे रस्त्यावर पाणी जमा झाल्याने हिंगोली - नांदेड मार्ग काही वेळ बंद होता. याच नदीचे पाणी बिबथर गावात शिरले होते. वसमत तालुक्यातील किन्होळा गावात आसना नदीचे पाणी शिरले होते. या सर्व ठिकाणी महसूल व पोलिस प्रशासन लक्ष ठेवून होते.

पाच घरांचे नुकसान

वसमत तालुक्यातील गिरगाव येथे पावसाने पाच घरांचे नुकसान झाले आहे. औंढा तालुक्यातील दरेगाव येथील नदीला आलेल्या पुरामुळे तीन विद्यार्थ्यांना दहावीच्या पुरवणी परीक्षेस जाता आले नाही. त्यांचा गणिताचा पेपर होता. हिंगोली शहरातील महादेववाडी भागात कयाधू नदीचे पाणी आले. खटकाळी बायपास भागात रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने वळण रस्त्यावर पाणी जमा झाल्याने हा रस्ता बंद झाला होता. ३३ केव्ही वीज उपकेंद्रात पावसाचे पाणी गेल्याने शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा रात्री अकरापर्यंत बंद होता.

धरणांतून विसर्ग सुरूच

कळमनुरी तालुक्यातील इसापूर धरणाचे १३ दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणातून सलग सातव्या दिवशीही आज सकाळी साडेआठला चौदापैकी बारा दरवाजे उघडून पूर्णा नदीपात्रात ९३,०५९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात होता.

loading image
go to top