हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain

हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस

हिंगोली : जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारीही (ता. पाच) सुरूच होता. यात कुठे हलका तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. औंढा शहरात झालेल्या जोरदार पावसाने ओढ्या नाल्यांना पाणी आले होते. आर्द्रा नक्षत्राच्या शेवटच्या चरणात सोमवारी व मंगळवारी असा सलग दोन दिवस जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा व सेनगाव तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. या पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. हिंगोली शहरात मध्यरात्री सुरू झालेला दमदार पाऊस सकाळी देखील सुरूच होता. दुपारी अधून- मधून पावसाच्या सरी सुरु होत्या. तर, औंढा नागनाथ येथे रात्री व दिवसभर धो- धो पाऊस झाला. या पावसामुळे शेतकरी समाधानी झाले आहेत. ज्यांच्या पेरण्या बाकी आहेत, असे शेतकरी या पावसामुळे पेरण्या करतील, असे बोलले जात आहे.

२१ मिलिमीटर पावसाची नोंद

हिंगोली : जिल्ह्यात मंगळवारी (ता. पाच) सकाळी आठ वाजेपर्यंत मागील २४ तासांत २१.९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर, जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १९३.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या २२.५२ टक्के इतका पाऊस झाला आहे. मंगळवारी सकाळपर्यंत मागील २४ तासांत झालेला पाऊस तालुकानिहाय पुढीलप्रमाणे ः कंसातील आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत. हिंगोली ३०.५० (२४७.००) मि.मी., कळमनुरी १९.०० (१८१ ७०) मि.मी., वसमत १८.७० (१७३.६०) मि.मी., औंढा नागनाथ १८.४० (१७८.२०) मि.मी, सेनगाव २०.८० (१७७.१०) मि.मी पाऊस झाला आहे.

परभणी जिल्ह्यात १० मि.मी. पाऊस

परभणी, ता. ५ ः जिल्ह्यात मंगळवार (ता. ५) सकाळपर्यंत मागील २४ तासांत सरासरी १०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलीमीटरमध्ये असून, कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे. परभणी ७.१ (२९.७), जिंतूर १५.४ (४१.०), पूर्णा २१.२ (४६.२), पालम ८.१ (४९.०), गंगाखेड १६.१ (२७.७), सेलू ३.२ (१७.४), सोनपेठ १३.९ (१९.८), पाथरी २.७ (७.३) आणि मानवत तालुक्यात ४.४ (१३.१) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७६१.३ मिलिमीटर असून, ता. १ जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी २१.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

Web Title: Hingoli District Rain For The Second Row

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..