esakal | हिंगोली : कोविड लसीकरणाबाबत आजपासून चार जिल्ह्यात ड्राय रन घेतला जाणार- राजेश टोपे
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते .

हिंगोली : कोविड लसीकरणाबाबत आजपासून चार जिल्ह्यात ड्राय रन घेतला जाणार- राजेश टोपे

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : केंद्र शासनाच्या निर्णयानुसार राज्यात शनिवार (ता. दोन) पासून पुणे, नागपूर, नंदुरबार, जालना या चार जिल्ह्यात ड्राय रन घेतला जाणार असून प्रत्यक्षात लसीकरणासाठी १६ हजार जणांना व्हॅक्सीनेटर म्हणून प्रशिक्षण दिल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी (ता. एक) पत्रकार परिषदेत दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलतांना टोपे म्हणाले की, कोविड लसीकरणाबाबत शनिवार (ता. दोन) पासून राज्यात चार जिल्ह्यात ड्राय रन घेतला जाणार आहे. त्यासाठी २५ जणांसोबत प्रत्यक्षात लसीकरणाचा ट्रायल घेतला जाणार आहे. यामध्ये त्यांच्या भ्रमणध्वनीवर संदेश पाठवून त्यांना लसीकरण केंद्रावर बोलावले जाईल  तसेच लसीकरण करून चौथ्या टप्प्यात त्यांना अर्धा तास पर्यवेक्षणाखाली ठेवले जाणार आहे.

राज्यात प्रत्यक्षात कोविड लसीकरणाची सर्व तयारी पूर्ण झाली असून लसीकरणासाठी १६ हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्या माध्यमातून लसीकरणाचे काम केले जाणार आहे. या शिवाय कोविड लसीकरणासाठी कोल्ड चैन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ज्या बाबींची कमतरता आहे त्याबाबत केंद्र शासनाला कळवण्यात आले असून केंद्र शासनाकडून त्याची पूर्तता करण्यासाठी योग्य काळजी घेईल असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच औरंगाबादचे संभाजीनगर नावाबद्दल ते म्हणाले औरंगाबाद शहराच्या नामांतर हा सर्वासाधारन चर्चेचा विषय नाही. त्याबाबत कोअर समितीच निर्णय घेईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे