डिजिटल शाळांमध्ये हिंगोली अव्वल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

शिक्षण विभाग, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचा पुढाकार

शिक्षण विभाग, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचा पुढाकार

हिंगोली - जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व ८७० शाळा डिजिटल झाल्या असून राज्यात शंभर टक्के शाळा डिजिटल झालेल्या चार जिल्ह्यांमध्ये हिंगोली जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे हिंगोलीच्या शिक्षण खात्याच्या शिरपेचात मानाचा तूर रोवल्या गेला आहे.  जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ८७०  शाळा आहे. या सर्वच्या सर्व शाळा डिजिटल करण्याचे प्रयत्न मागील शैक्षणिक वर्षापासून सुरू होते. शाळा डिजिटल करण्याची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर सोपविण्यात आली होती. त्यानुसार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्या जयश्री आठवले, शिक्षणाधिकारी दीपक चवणे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिवाजी पवार, उपशिक्षणाधिकारी डी. के. इंगोले यांनी वेळोवेळी शाळांना भेटी देऊन डिजिटल शाळेचे महत्त्व पटवून दिले होते. याशिवाय शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांशीही संवाद साधून त्यांना लोकसहभाग गोळा करण्याचे आवाहन केले होते. 

दरम्यान, अधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला गावकऱ्यांनी प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग जमा केला होता. औंढा तालुक्‍यातील वसई शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून लोकवर्गणी जमा केली होती. तर काही गावांमध्ये शिक्षकांनीच पुढाकार घेतला होता. यातून सर्वच शाळा डिजिटल झाल्या आहेत. या शाळांमधून विद्यार्थी आता सर्वच विषयांमध्ये ऑनलाइन माहिती बघू लागले आहेत. डिजिटल शाळांचा आनंद या विद्यार्थ्यांना मिळू लागला आहे. या शाळांमधून दररोज एका वर्गाला डिजिटल खोलीमध्ये बसवून शिक्षण दिले जात आहे. दरम्यान, राज्यातील सर्व जिल्ह्यांतील शाळा डिजिटल करण्याचे शासनाच्या सूचना होत्या. मात्र, मागील वर्षीत केवळ चार जिल्ह्यातील शाळाच डिजिटल होऊ शकल्या आहेत. यामध्ये धुळे, गोंदिया, हिंगोलीसह अन्य एका जिल्ह्याचा समावेश आहे. हिंगोली जिल्हा शिक्षण विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला आहे.

Web Title: hingoli marathwada news hingoli topper in digital school