esakal | हिंगोली : मार्केट यार्डने वसमतच्या वैभवात पडणार भर

बोलून बातमी शोधा

hingoli market yard
हिंगोली : मार्केट यार्डने वसमतच्या वैभवात पडणार भर
sakal_logo
By
पंजाब नवघरे

वसमत (जिल्हा हिंगोली) : वसमत विधानसभा मतदार संघातील विविध समस्या सोडण्यासाठी आमदार राजू नवघरे यांनी पुढाकार घातला आहे. आता नव्याने मार्केट यार्ड उभारण्यासाठी मंजुरी मिळाली असून यामुळे वसमतच्या वैभवात भर पडणार आहे.

या संदर्भात मुंबई येथील मंत्रालयात अर्थमंत्री अजित पवार, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी साखर संघाचे अध्यक्ष माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार राजू नवघरे, वित्त विभागाचे मुख्य सचिव मनोज सवनिक आदींची उपस्थिती होती. माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर व राजू नवघरे यांनी वसमत विधानसभा मतदार संघातील विविध समस्या सोडविण्यासाठी मंत्री महोदयांना साकडे घातले. सतत पाठपुरावा सुरु ठेवल्याने वसमत येथे मार्केट यार्ड उभारण्यास मंजुरी देण्यात आली. यामुळे वासमतच्या वैभवात भर पडण्यास मदत होणार आहे. या बैठकीत जिल्ह्यात कोरोना आजारामुळे रुग्णाला विविध समस्याना सामोरे जावे लागत असल्याचे आमदार नवघरे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानुसार जिल्ह्याला मुबलक ऑक्सिजन व रेमेडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यातील ' हे ' गाव 'कोव्हॅक्सिन' लसीकरणात प्रथम; जिल्हाधिकारी, खासदारांची भेट

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घेतली भेट

दरम्यान, आमदार राजू नवघरे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचीही मंत्रालयात भेट घेऊन हिंगोली जिल्ह्यातील कोविड आजार व उपाययोजना संबंधी चर्चा केली. यावेळी ऑक्सिजन कॉन्सिस्टेटरची मागणी त्यांनी केली. मंत्री टोपे यांनी ही मागणी तात्काळ मान्य केली. तसेच लवकरच ऑक्सीजन कॉन्सिस्टेटर उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. तसेच वसमत येथे नव्याने उभारण्यात आलेल्या १३० बेडच्या आयटीआय कोविड सेंटरला ऑक्सीजनचा पुरवठा करुन तात्काळ सुरु करण्याच्या सुचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे वसमत तालुक्यातील बाभुळगाव, आरळ व औंढा नागनाथ तालुक्यातील साळना प्राथमिक आरोग्य केंद्रास तात्काळ मान्यता देण्यात यावी, अशी मागणी आमदार राजू नवघरे यांनी केली.

संपादन- प्रल्हाद कांबळे