हिंगोलीतील घरकुल लाभार्थ्यांची दिवाळी होणार गोड

Hingoli Municipality has given permission to 951 beneficiaries for construction of houses.jpg
Hingoli Municipality has given permission to 951 beneficiaries for construction of houses.jpg

हिंगोली : शहरात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हिंगोली नगर पालिकेने एकूण एक हजार ९८ पैकी ९५१ लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी परवानगी दिल्यानंतर त्यातील ७० घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यांना शेवटचा हप्ता मिळाला नसल्याने घरकुल लाभधारक आर्थिक अडचणीत सापडले होते. मात्र, केंद्राकडून तीन कोटी २३ लाख ६० हजार रूपयाचा निधी प्राप्त झाल्याने आता घरकुल लाभार्थ्यांची दिवाळी गोड होणार आहे. 

हिंगोली शहरातील अनेक नागरिकांना पक्का निवारा नसल्याने नगर पालिकेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी घरकुलासाठी नोंदणी केली, अशा एकूण एक हजार ९८ लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर करण्यात आले आहेत. त्यातील ९५१ लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी नगर पालिकेने परवानगी दिली होती. ज्यामध्ये २५७ लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम प्रगतीपथावर असून ७० लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम पूर्ण झाले आहे. लाभार्थ्यांना चार टप्प्यामध्ये घरकुल बांधकामासाठी अडीच लाख रूपयाचा निधी नगर पालिकेकडून दिला जात आहे.

हिंगोली नगर पालिकेला एक हजार ९८ घरकुल बांधकामासाठी २७ कोटी ४५ लाख रुपयाचा निधी केंद्र व राज्य शासनाकडून अपेक्षित असताना आतापर्यंत राज्याच्या हिश्याचे सर्वच्या सर्व १० कोटी ९८ लाख रूपये देण्यात आले आहेत. तसेच केंद्राचे ३५ लाख ४० हजार रूपये प्राप्त झाले होते. त्यातील पहिला हप्ता ६५६ लाभार्थ्यांना प्रत्येकी ४० हजार रूपयाप्रमाणे तर दुसरा हप्ता ५९५ लाभार्थ्यांना एक लाख रूपयाप्रमाणे तर तिसरा हप्ता १०० लाभार्थ्यांना ६० हजार रूपये याप्रमाणे देण्यात आलेला आहे. ४७० लाभार्थ्यांनी घरकुल बांधकाम करुन अनेक महिने उलटले तरी त्यांना शेवटचा चौथा ५० हजार रूपयाचा हप्ता मिळाला नसल्याने ते आर्थिक संकटात सापडले होते. 

तसेच मागील काही महिन्यापासून कोरोनाच्या संकटामुळे केंद्राकडून निधी आला नसल्याने सर्वचजण निधीच्या प्रतीक्षेत होते. मागील काही दिवसांपूर्वी म्हाडातर्फे केंद्राच्या हिश्यातील तीन कोटी ३२ लाख ४० हजार रूपयाचा निधी हिंगोली नगर पालिकेला वर्ग केला आहे. 

या निधीतून ज्या लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम पूर्ण झाले आहे, अशांना प्रत्येकी ५० हजार रूपयांप्रमाणे शेवटचा अंतिम हप्ता दिला जाणार आहे. येत्या एक - दोन दिवसात घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर लाभाचा शेवटचा हप्ता वर्ग केला जाणार आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच लाभार्थ्यांना तो हप्ता मिळणार असल्याने लाभार्थ्यांची ही दिवाळी गोड होणार आहे .

हिंगोली नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे म्हणाले, हिंगोली नगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर घरकुलाची बांधकामे सुरु केली आहेत. ४७० घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यांना अंतिम पन्नास हजार रुपयांचा हप्ता लवकरच दिला जाणार आहे. या लाभार्थ्यांना घरपट्टी व नळपट्टी भरणे बंधनकारक असणार आहे.  


संपादन - सुस्मिता वडतिले 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com