शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी तयारीला लागा - रामदास कदम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

हिंगोली - राज्याचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला मिळण्यासाठी पदाधिकारी व शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज (शनिवार) शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या बैठकीत केले.

हिंगोली - राज्याचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला मिळण्यासाठी पदाधिकारी व शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज (शनिवार) शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या बैठकीत केले.

येथील शासकीय विश्रामगृहामध्ये शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवरानी नरवाडे, शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष बांगर, आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा, आमदार हेमंत पाटील, आमदार नागेश पाटील आष्टीकर, युवा सेना जिल्हा प्रमुख दिलीप घुगे, बाजीराव सवंडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना कदम म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्यासाठी प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेतले जात आहेत. गावपातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अर्ज भरून घ्यावे. त्यानंतर हे अर्ज पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे सादर केले जाणार आहेत. आगामी निवडणुकीमध्ये राज्यात शिवसेनेची एकहाती सत्ता येऊन विधानसभेवर भगवा फडकला पाहिजे. तसेच राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच झाला पाहिजे, यासाठी आतापासूनच कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. गावपातळीवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या कराव्यात, गट प्रमुख, शाखा प्रमुख, बुथ प्रमुखांच्या नियुक्‍त्या करून गावपातळीवर शिवसेना अधिक मजबूत झाली पाहिजे याकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. गावपातळीवरील कुठल्याही शिवसैनिकास त्रास होऊ नये याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. यावेळी सरकारमधून कधी बाहेर पडणार या प्रश्‍नाला उत्तर देताना "योग्य वेळ आल्यानंतर शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल. मात्र हा निर्णय सर्वस्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील', असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

भाजपकडून शिवसेनेला नेहमीच कमी लेखले जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपाच आपला प्रतिस्पर्धी असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: hingoli news marathi news maharashtra news ramdas kadam shivsena