पॅकेज विशेष; पण निधीचा अनुशेष!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

हिंगोली - मराठवाडा-विदर्भ विशेष पॅकेजअंतर्गत मागणी केलेल्या 35 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्याच्या ऊर्जा विभागाकडे धूळ खात पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाच हजार शेतकरी अद्यापही शेतीपंपासाठी वीजजोडणीच्या प्रतीक्षेत आहेत.

हिंगोली - मराठवाडा-विदर्भ विशेष पॅकेजअंतर्गत मागणी केलेल्या 35 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्याच्या ऊर्जा विभागाकडे धूळ खात पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाच हजार शेतकरी अद्यापही शेतीपंपासाठी वीजजोडणीच्या प्रतीक्षेत आहेत.

सिंचनासाठी पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्यासाठी मराठवाडा-विदर्भ पॅकेज तयार करण्यात आले. या पॅकेजअंतर्गत अनामत घेऊन वीजजोडणी दिली जाणार होती. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे पाच हजार शेतकऱ्यांनी वीज कंपनीकडे अनामतीचा भरणा केला. कंपनीकडून अद्यापही या शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी जोडणी दिलेली नाही. या शेतकऱ्यांना वीजजोडणीसाठी 35 कोटींचा निधी देण्याचा प्रस्ताव महावितरण कंपनीने ऊर्जा विभागाकडे पाठविला आहे.

त्यात खांब, वाहिन्या, रोहित्र आदींसह अन्य कामांचा उल्लेख आहे. निधीसाठी कंपनीने एक वर्षापासून पाठपुरावा केला असला तरी ऊर्जा विभागाने निधी दिलेला नाही. त्यामुळे पाच हजार शेतकऱ्यांना वीजजोडणीची प्रतीक्षा आहे.

चौकशीसाठी शेतकऱ्यांच्या फेऱ्या
अनामत भरूनही वीजजोडणी का दिली जात नाही, अशी विचारणा करण्यासाठी शेतकरी दररोज महावितरण कंपनीच्या त्या-त्या कार्यालयांचे उंबरठे झिजवू लागले आहेत. कंपनीचे अधिकारी, कर्मचारी शासनाकडे बोट दाखवून मोकळे होत आहेत. यावर आता वीज कंपनीनेच तातडीने तोडगा काढून वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Web Title: hingoli news marathwada vidarbha special package fund