हिंगोली : बनावट नोटाप्रकरणी नागपूरमधून एकाला अटक

राजेश दारव्हेकर
Wednesday, 16 September 2020

आनंदनगर भागात बुधवार (ता. दोन) टाकलेल्या छाप्यात बनावट नोटाप्रकरणी गुरुवारी (ता. तीन) हिंगोली ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपासादरम्यान सुरवातीला एक स्त्री, सहा पुरुष आरोपी अटक करण्यात आले.

हिंगोली : आनंदनगर भागातील बनावट नोटाप्रकरणी नागपूर येथून एका आरोपीला मंगळवारी (ता. १५) अटक करून त्याच्याकडून भारतीय चिल्ड्रन बँकेच्या आठ लाख रूपयांच्या नोटा जप्त केल्याची माहिती हिंगोली पोलिसांनी दिली. मात्र गावभर चर्चा झालेल्या व सध्या पोलिस कोठडीत असलेल्या आरोपीच्या नावाबद्दल मात्र पोलिस विभागाकडून मोठी गुप्तता पाळली आहे. त्याबद्दल पोलिसांच्या कारवाईवरच संशय व्यक्त होत आहे.  

आनंदनगर भागात बुधवार (ता. दोन) टाकलेल्या छाप्यात बनावट नोटाप्रकरणी गुरुवारी (ता. तीन) हिंगोली ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपासादरम्यान सुरवातीला एक स्त्री, सहा पुरुष आरोपी अटक करण्यात आले. पुर्वी अटक केलेल्या आरोपीपैकी महिला आरोपी व इतर तीन पुरुष आरोपीकडील तपास पुर्ण झाल्याने त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. उर्वरित तीन पुरुष आरोपींना परत (ता. १५) पर्यंत पोलिस कोठडी मंजुर केल्याने त्या दरम्यान गुन्ह्यातील एका आरोपीकडुन नागपुर येथुन भारतीय चिल्ड्रन बँकेच्या आठ लाख रुपये किंमतीच्या नोटा पोलिस उपनिरीक्षक श्री. पांडे व त्यांच्या पथकाद्वारे मंगळवारी जप्त करण्यात आल्या. 

हेही वाचा प्लाझ्मा दानसाठी कोरोना यौद्ध्यांची यादी जाहिर करावी- डॉ. गंगाधर घुटे -

आतापर्यंत सात आरोपींना ताब्यात घेतले

त्यानंतर सदर तीन आरोपीतांना न्यायालयात हजर केले. त्यांना शनिवार (ता. १९) पर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी दिली. आजपर्यंत २६ लाख ६१ हजार ३५० रुपयांच्या भारतीय चलनाच्या बनावट नोटा व २० हजार रुपयांच्या नगदी व सहा लाख ६२ हजार ९७५ रुपयांचे साहित्य व गाडी असा एकुण ३३ लाख ४४ हजार ३२५ रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला. ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या पथकाने आतापर्यंत सात आरोपींना ताब्यात घेतले. 

आरोपीचे नाव नाही सांगता येणार- चिंचोलकर

बनावट नोटा प्रकरणी नागपूर येथून अटक केलेल्या आरोपीला बुधवारी (ता. १६) हिंगोली न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडीत पाठविले आहे. पोलिस कोठडी मिळाल्यानंतरही आरोपीचे नाव पोलिस विभागाकडून का दडविल्या जात आहे. याबाबत पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. चिल्‍ड्रन बँकेच्या नोटा त्याच आरोपीकडे होत्या का असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे. श्री. चिंचोलकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी पोलिस कोठडीत असलेल्या आरोपीचे नाव सांगण्यास असमर्थता दर्शविली. 

येथे क्लिक कराहिंगोली : लॉकडाऊन काळात पाच महिन्यात वीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दहा पात्र, आठ प्रलंबित

बसच्या काचा फोडणारे फरार आरोपी ताब्यात 

शेवाळा ः कळमनुरी तालुक्यातील शेवाळा गावालगत शेवाळा रस्त्यावर बसच्या काचा फोडणारे फरारी पाच आरोपी मंगळवारी (ता. १५) पोलिसांच्या ताब्यात सापडले. शेवाळा गावाजवळ शुक्रवारी (ता. दहा) दुपारी तीन वाजता अज्ञात युवकांनी हदगाव आगाराची बाळापुर ते हदगाव बसच्या काचा फोडून एसटी बस पेट्रोलने पेटवून दिल्याची घटना घडली होती. सदर आरोपी मागील पाच दिवसांपासून फरार होते. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक रवी हुंडेकर यांनी हनुमंत मुपडे यांनी आरोपींचा शोध घेतला. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत बसच्या काचा फोडणारे आरोपी सचिन मिराशे, हरीराचंद्र मोरे, गोंविद मिराशे, तुकाराम नरवाडे, गजानन शिंदे (रा. येलकी, धावंडा, कामठा, शेवाळा ता. कळमनुरी) यांना अटक करुन पोलिस कोठडी देण्यात आली. तपास बाळापूर पोलिस करत आहेत. 

संपादन-  प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: One arrested from Nagpur in counterfeit note case hingoli news