
अन्न धान्य गोरगारीबांना वाटप करण्यासाठी रेशन दुकानदारांना विविध नियमावली लावण्यात आली आहे. लाभार्थ्यांची लूट होऊ नये यासाठी प्रत्येक दुकानदाराकडे भावफलक व माहितीदर्शक फलक असणे सक्तीचे केले आहे
सेनगाव ( जिल्हा हिंगोली ) : तालुक्यातील रेशन दुकानावरुन भावफलक व माहितीदर्शक फलक गायब असल्यामुळे शासनाची पायमल्ली होत आहे. भावफलक नसल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. याकडे सेनगावच्या पुरवठा विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
अन्न धान्य गोरगारीबांना वाटप करण्यासाठी रेशन दुकानदारांना विविध नियमावली लावण्यात आली आहे. लाभार्थ्यांची लूट होऊ नये यासाठी प्रत्येक दुकानदाराकडे भावफलक व माहितीदर्शक फलक असणे सक्तीचे केले आहे. परंतु सेनगाव तालुक्यात शासनाच्या नियमाची पायमल्ली होत असून तालुक्यात एकूण १४८ रेशन दुकानदार आहेत. यातील एकाही रेशन दुकानदाराकडे भावफलक व माहितीदर्शक फलक लावण्यात आलेले दिसून येत नाहीत. यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. संबंधित दुकानदाराकडून अव्वाच्या सव्वा धान्य वितरण केले जाते की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील बहुतांश स्वस्त धान्य दुकानात दरपत्रक व माहितीदर्शक फलक नसल्यामुळे स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करून योग्य कार्यवाही करण्याची मागणी होऊ लागली.
हेही वाचा - भोकरचे नागनाथ घिसेवाड यांचा भाजपला जय श्रीराम, काॅंग्रेस पक्षात प्रवेश -
गोरगरीबांना स्वस्त दरात अन्न धान्य वितरित करण्याची भूमिका केंद्र व राज्य शासनाने घेतली असून हे अन्न धान्य लाभार्थ्यांपर्यंत सवलतीच्या दरात व योग्य प्रमाणात होण्याकरीता प्रत्येक रेशन दुकानात भावफलक, उपलब्ध साठा, तक्रार वही ठेवणे बंधनकारक आहे. तसेच शासनाकडून लाभार्थ्यांसाठी तक्रार निवारण व्यवस्था सुध्दा राबविण्यात येत असून प्रत्येक दुकानदाराकडे तक्रार पेटी असणे आवश्यक आहे. मात्र तालुक्यात कुठल्याच दुकानदाराकडे तक्रार पेटी आढळून आलेली नाही. त्यामुळे शासनाच्या नियमाची पायमल्ली होत असल्याचा प्रकार देखील पहावयास मिळत आहे. तालुक्यातील रेशन दुकानदारांना पुरवठा विभागाकडून अभय मिळत असल्यामुळे कार्यवाही होत नसल्याचा आरोप होत आहे. या सर्व प्रकाराकडे तहसील प्रशासनाने सुध्दा साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन संबंधिताची चौकशी करून योग्य कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे