Hingoli : रेल्वेप्रश्नावर हिंगोलीकर करणार जनआक्रोश

जालना-छपरा एक्स्प्रेस औरंगाबाद मार्गे वळवली
Hingoli
Hingoli sakal

हिंगोली : हिंगोली मार्गे असलेली जालना-छपरा एक्स्प्रेस रेल्वे औरंगाबाद मार्गे वळविल्याने हिंगोलीकर आक्रमक झाले. गुरुवारी (ता. तीन) हिंगोली येथे झालेल्या बैठकीत तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटना, पत्रकार व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीच्या प्रास्ताविकात वसंत भट्ट यांनी करीत रेल्वेच्या प्रश्नाबाबत भूमिका मांडली. रेल्वे रुंदीकरणास १४ वर्ष लोटले असले तरी अजूनही हिंगोलीपासून मुंबई रेल्वे नियमित सुरू झालेली नाही. त्यातच हिंगोली मार्गे छपरा (बिहार) येथे जाणारी रेल्वेगाडी मंजूर झाली होती. परंतु, हिंगोलीकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला. जालना-छपरा गाडी औरंगाबाद मार्गे वळवल्याचे वक्तव्य श्री. दानवे यांनी केले. यामुळे हिंगोली जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

व्यापारी महासंघाचे नंदकिशोर तोष्णीवाल, माजी आमदार गजानन घुगे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विनायकराव भिसे, गोवर्धन विरकुंवर, पंकज अग्रवाल यांनी रेल्वे प्रश्नावर सर्व सामान्य नागरिकांनी जागरूक होण्याचे आवाहन केले. यावेळी हिंगोली येथे मिटरगेज असताना ज्या गाड्या चालविल्या जात होत्या, त्या रेल्वेगाड्यादेखील अद्याप नियमित झालेल्या नाहीत. काही गाड्या रद्द केलेल्या आहेत. रेल्वे रुंदीकरणानंतर हिंगोली स्थानकावर मोठ्या प्रमाणात गाड्यांची सुविधा होईल, अशी अपेक्षा असताना सातत्याने रेल्वे प्रशासन हिंगोलीकरांच्या मागण्या डावलत आहे. अशा वेळी या न्याय मागण्यासाठी आक्रमक स्वरूपात आंदोलन करण्याचा निर्णय झाला.

बैठकीला माजी नगरसेवक अनिल नेनवाणी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतीश महागावकर, विराट लोकमंचचे शेख नईम शेख लाल, मनसे जिल्हा प्रमुख बंडू कुटे, माजी नगरसेवक बिरजू यादव, सुभाष अपूर्वा, सुमित चौधरी, किशोर कवठे, सुधीर गरड, असेफ पठाण, उमेश जाधव, गजानन घोडे, अ‍ॅड. अर्चना जमदाडे, अ‍ॅड. पार्वती पाटील, अ‍ॅड. राजेंद्र अग्रवाल, बंडू कुटे, प्रा. भानुदास पवार, अ‍ॅड. अनिल तोष्णीवाल, खलील बेलदार, विठ्ठलराव घुगे, श्‍यामराव जगताप, जेठानंद नैनवानी, नोमान शेख नईम, सुधाकर वाढवे यांच्यासह इतर उपस्थित होते.

असे असेल आंदोलन

या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यामार्फत रेल्वे प्रशासनाला सोमवार ७ नोव्हेंबरला निवेदन दिले जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने या निवेदनाची दखल घेतली नाही तर आगामी काळात रेलरोको आंदोलन, रस्तारोको आंदोलन, हिंगोली जिल्हा बंद अशा स्वरूपाचे आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्याचा निर्णय एकमताने मांडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com