हिंगोली : सेनगावात अन्न सुरक्षा योजनेत सावळा गोंधळ, पुरवठा विभागाचे दुर्लक्ष 

विठ्ठल देशमुख
Monday, 30 November 2020

सेनगाव येथील पुरवठा विभागा अंतर्गत तालुक्यामध्ये जवळपास १४८ रेशन दुकानदार आहेत. यामध्ये अनेक रेशन दुकानदाराकडून लाभार्थ्यांना शासनाकडून येणारे धान्य सरसगट वितरण होत नसल्याचा आरोप लाभार्थ्यांमधून केला जात आहे.

सेनगाव (जिल्हा हिंगोली) : तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून धान्याचा काळाबाजार सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. परंतु संबंधित पुरवठा विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना पहायला मिळत आहे. वरिष्ठानी या गंभीर प्रकाराकडे वेळीच लक्ष देऊन संबंधिताची सखोल चौकशी करून योग्य कार्यवाही करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

 

सेनगाव येथील पुरवठा विभागा अंतर्गत तालुक्यामध्ये जवळपास १४८ रेशन दुकानदार आहेत. यामध्ये अनेक रेशन दुकानदाराकडून लाभार्थ्यांना शासनाकडून येणारे धान्य सरसगट वितरण होत नसल्याचा आरोप लाभार्थ्यांमधून केला जात आहे. तर अनेकांकडे अद्याप शिधा पत्रिका सुध्दा नाहीत त्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंब दिवाळी सनामध्ये सुध्दा अन्नधान्यापासून वंचित राहिले आहेत. शिधा पत्रिका मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी सेनगाव पुरवठा विभागात चकरा मारुन सुध्दा त्यांना उध्दटपणाची वागणूक देऊन हकलून दिले जात असल्याचा प्रकार सुध्दा पहायला मिळत आहे. त्यामुळे संबंधित पुरवठा विभागाच्या कामकाजावर संशय निर्माण होत आहे. 

हेही वाचा परभणी : एसपी मीनांच्या विशेष पथकाने केली आंतरजिल्हा चंदन तस्कर टोळी जेरबंद, आज करणार न्यायालयासमोर हजर

काही दिवसांपूर्वी सेनगाव शहरामध्ये हिंगोली पथकाने काळ्या बाजारात जाणाऱ्या रेशनचे ट्रक पकडण्यात यश मिळवले होते. ही धाडसी कार्यवाही केल्यानंतर हिंगोली पोलिसांचे सर्व स्तरावरुन कौतुक केले जात होते. परंतु संबंधित पुरवठा विभागाचे रेशन दुकानदारांना अभय मिळत असल्यामुळे यावर कायमस्वरूपी अंकुश बसेल असे वाटत नाही. त्यामुळे हा प्रकार अजूनही सुरुच असल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण भागातून हे रेशन रिसोडच्या दिशेने काळ्या बाजारात नेऊन विक्री केल्याचा प्रकार पहायला मिळत आहे. शासनाने गोरगारीबांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी विविध योजनेअंतर्गत रेशन स्वस्त दरात पुरवठा विभागामार्फत वितरण केले जाते. मात्र हे रेशन धान्य गोरगारीबांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप होत आहे. शिवाय या पुरवठा विभागामध्ये तक्रार निवारण व्यवस्था सुध्दा नावापूर्ती मर्यादित आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी तक्रार द्यायची कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वरिष्ठानी या गंभीर प्रकाराकडे वेळीच लक्ष देऊन संबंधित पुरवठा विभागाची सखोल चौकशी करून योग्य अशी कार्यवाही करण्याची मागणी लाभार्थ्यांमधून होऊ लागली आहे.

येथे क्लिक करा -  नांदेड : लसाकमच्या कार्यकर्त्यांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही- चंद्रकांत मेकाले -

शिधा पत्रिकेत नाव वाढवून घेणे किंवा नवीन शिधा पत्रिकेसाठी अर्ज सादर केल्यानंतर केवळ सात दिवसामध्ये शिधा पत्रिका देण्याची तरतूद आहे. मात्र सेनगावच्या पुरवठा विभागाकडून नवीन शिधा पत्रिका वाटप बंद असल्यामुळे दिवाळीमध्ये अनेक कुटुंब अन्न धान्यापासून वंचित राहिल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ मधील तरतूदीनुसार अन्न धान्यापासून वंचित असलेल्या नागरिकांना रितसर तक्रार देण्यासाठी कलम १५ नुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये वितरण कार्यालयात तक्रार निवारण व्यवस्था असणे बंधनकारक आहे. परंतु तालुक्यामध्ये कुठेही तक्रार करण्यासाठी व्यवस्था दिसून येत नाही. त्यामुळे तक्रार निवारणाचा सुध्दा फज्जा उडालेला पहायला मिळत आहे.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Shadow confusion in food security scheme in Sengaon, neglect of supply department nanded news