
विशेष पथकाने बीड, अहमदनगर आणि सोलापूर या आंतर जिल्हा चंदन तस्कर टोळीस जेरबंद करीत जिल्ह्यात मोठी कारवाई केल्याने चंदन माफियांचे धाबे दणाणले आहे.
परभणी : पोलिस अधीक्षक जयंत मिना यांच्या विशेष पथकाचे पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह चंदन तस्करांची टोळी रामेटाकळी (जिल्हा परभणी) परिसरातून रविवारी (ता. २९) जेरबंद केली. एवढेच नाही तर त्यांच्याकडून दहा किलो चंदन, चार दुचाकी आणि एक चारचाकी वाहन असा तीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पथकाचे पोलिस अधीक्षक जयंत मिना यांनी कौतुक केले.
रविवार (ता. २९) रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील रामेटाकळी परिसरात यशस्वी सापळा रचून चंदन तस्करांची आंतर जिल्हा टोळीससह २५ हजार रुपये किंमतीचे १० किलो चंदन, चार जुन्या दुचाकी ( किंमत एक लाख २० हजार रुपये),चंदनाची तस्करी करण्यासाठी वापरण्यात येणारी चारचाकी इंडिका कारसह तब्बल दोन लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच विशेष पथकाने आंतर जिल्हा चंदन तस्करांची टोळी जेरबंद केल्याने अनेक गुन्हेगार भूमिगत झाले आहेत.
हेही वाचा - नांदेड : जिल्ह्यात ऑनलाईन मटका जुगार जोमात, ‘सुपरकिंग कॅसीनोद्वारे अवघ्या दोन मिनिटात निकाल
जिल्ह्यात मागील अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या शेतातील चंदनांची झाडे चोरीस जाण्याच्या घटना घडत होत्या. अशीच एक घटना मानवत तालुक्यातील बोंदरवाडी येथील शेतकरी रामेश्वर भागीरथ कबले यांच्या बोंदरवाडी शेत शिवारातील गट नं. ११ या शेताच्या धुऱ्यावर असलेले अंदाजे दहा फुट उंचीची दोन चंदनाची झाडे किंमत अंदाजे आठ हजार रुपये ता. २५ ते २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बुडापासून लोखंडी करवतीच्या साहाय्याने कापून नेल्याची घटना घडली होती. या संदर्भात रामेश्वर कबले यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
येथे क्लिक करा - कॉँग्रेसच्या उर्जा मंत्र्यांचा शिवसेना - राष्ट्रवादीने गेम केला, बबनराव लोणीकर यांचा आरोप
जिल्ह्यात चंदन चोरी करुन तस्करी करणारी एखादी टोळी तर सक्रीय झाल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार यांना मिळाली. यावरुन श्री. पवार यांच्या नेतृत्वाखालील पोलिस अमलदार सुग्रीव केंद्रे, यशवंत वाघमारे, राहूल चिंचाने, शंकर गायकवाड, विष्णु भिसे, दिपक मुदिराज यांच्या पथकाने सापळा रचून रविवारी (ता. २९) आरोपी भिमा लक्ष्मण गायकवाड रा. हारळवाडी ता. मोहळ जिल्हा सोलापूर, बप्पा नामदेव माने रा. जामखेड जिल्हा अहमदनगर, नवनाथ कल्याण माने रा. माऊलीनगर ता. पाटोदा, जि. बीड, सतिश निवृत्ती जाधव रा. कोरेगाव ता. कर्जत, जि. अहमदनगर, अक्षय नवनाथ माने रा. माऊलीनगर पाटोदा, जि. बीड, संतोष जालंधर माने रा. माऊलीनगर पाटोदा, जि. बीड, लक्ष्मण गोरख जाधव रा. दहिवंडी ता. शिरोड जि. बीड, सोनाजी देवराव जाधव रा. पाडळी ता. शिरोट, जि. बीड, भारत भाऊराव जाधव रा. दहिवंडी ता. शिरोड जि. बिड या आंतर जिल्हा चंदन तस्करांच्या टोळीस जेरबंद केले आहे. त्यांची सखोल चौकशी करुन त्यांना मानवत पोलिसांच्या स्वाधीन केले असून सोमवारी (ता. ३०) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांत पवार यांनी दिली.
संपादन - प्रल्हाद कांबळे