हिंगोली अर्बन परिवाराने दिला मदतीचा हात

राजेश दारव्हेकर/विनायक हेंद्रे
Sunday, 5 April 2020

कोरोनाबाधित रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी दानशूर मदत करीत आहेत. येथील हिंगोली अर्बन परिवार व परिवाराचे अध्यक्ष जयेश खर्जुले यांच्यातर्फे दीड लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात आली आहे.

हिंगोली : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी दानशूर मदत करीत आहेत. यात आपलाही खारीचा वाटा असावा व कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत, या उद्देशाने येथील हिंगोली अर्बन परिवार व परिवाराचे अध्यक्ष जयेश खर्जुले यांच्यातर्फे दीड लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात आली आहे.

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्‍तरावर विविध उपाययोजना सुरू असून यासाठी सर्व शासकीय यंत्रणादेखील कामाला लागली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत, आरोग्य, पोलिस, स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रत्येकजण मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहे.

हेही वाचाकर्तव्य बजावत पोलिसांनी जपली सामाजिक बांधिलकी

लॉकडाउनच्या काळातही गरजूंना मदत

 अनेकांनी सढळ हाताने मदतही दिली आहे. गरजूंना मदत मिळावी यासाठी लोकप्रतिनिधी, संस्था, संघटना, देवस्थान संस्थान, कार्यकर्ते मदतीचा हात पुढे करत आहेत. त्यामुळेच लॉकडाउनच्या काळातही गरजूंना मदत मिळत आहे. यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा, या हेतून येथील हिंगोली अर्बन परिवारातर्फे मदत करण्याचा निर्णय घेतला.

एक लाख ५० हजारांची मदत

 यासाठी हिंगोली अर्बनमध्ये काम करणारे कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा जमा झालेला पगार ५१ हजार व हिंगोली अर्बन परिवाराचे अध्यक्ष जयेश खर्जुले यांनी एक लाख रुपये, असे एकूण एक लाख ५० हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले आहेत. तसेच नागरिकांनी स्वत: व कुटुंबीयांची काळजी घ्यावी, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आपापल्या परीने सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

पोलिसांची रखवलदारास मदत

आखाडा बाळापूर : येथे मागील पाच वर्षांपासून रखवालदारी चे काम करणाऱ्या नेपाळमधील रखवालदारास पोलिसांच्या पुढाकारातून रविवारी (ता. पाच) महिनाभर पुरेल एवढे धान्य वाटप करण्यात आले. येथील मुख्य दुकान लाईन तसेच जुने दुकान लाईन भागामध्ये किराणा, कटलरी, औषधी, खते, बियाणे विक्रीची दुकाने आहेत. याशिवाय हॉटेल्सदेखील आहेत. रात्रीच्या वेळी या भागामध्ये आखाडा बाळापूर पोलिसांकडून गस्त घातली जाते.

येथे क्लिक करा - अफवा पसरविल्यास गुन्हे दाखल होणार : पोलिस अधीक्षक योगेश कुमार

रात्रीच्या वेळी गस्त

 याशिवाय पाच वर्षांपूर्वी नेपाळ येथून बलचित्र राणा हा व्यक्ती बाळापूर बाजारपेठेतील दुकान लाईन भागामध्ये रात्रीच्या वेळी गस्त घालतो. दुकानदारांनी दिलेल्या मदतीवर तो उदरनिर्वाह करतो. त्यामुळे आखाडा बाळापूर पोलिसांनाही मदत होते. मात्र, आता लॉकडाउनमुळे सर्व बाजारपेठ बंद आहे.

महिनाभर पुरेल एवढे साहित्य वाटप

 त्यामुळे बलचित्र राणा यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिस निरीक्षक विकास थोरात यांच्या पुढाकारातून पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी महिनाभर पुरेल एवढे साहित्य व धान्य जमा केले. रविवारी जमादार संजय मार्के, राजेश जाधव, गजानन मुलगीर, रमेश जोगदंड, श्री. ढोके यांच्या उपस्थितीत हे धान्य श्री. राणा यांना देण्यात आले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Hingoli Urban family provided a helping hand Hingoli news