ना बँडबाजा, ना बारात, दुचाकीवर वरात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

जिंतूर तालुक्‍यातील मानधनी येथील नवरदेवाने औंढा नागनाथ तालुक्यातील नवरीशी ठरलेल्‍या दिवशी लॉकडाउनमध्ये लग्न साध्या पध्दतीने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत केले. यानंतर नवरीला एका तासात नवरदेवाने दुचाकीवर घेवून गाव गाठले. या वेळी त्यांनी तोंडाला मास्‍क बांधून नियमांचे पालन केले. हा विवाह औंढा नागनाथला मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. 

औंढा नागनाथ ः ना बँडबाजा, ना बारात, ना गाजावाजा, ना अवाढव्य खर्च. यातच नवरदेव आला नवरी आली, महाराज व इतर अकरा नागरिकांच्या उपस्‍थितीत विवाह सोहळा पार पडला व एका तासात सर्व विधी आटोपून नवरदेव आणि नवरी तोंडाला मास्‍क बांधून गावाकडे गेले, अशा प्रकाराचा विवाह सोहळा सोमवारी पार पडला. या विवाहाची चर्चा गावात एकावयास मिळाली.  

जिंतूर तालुक्यातील मानधनी येथील भिकाजी घोडे यांचा मुलगा माणिक व औंढा येथील विलास रणखांबे यांची मुलगी अंजली यांचे यापुर्वीच लग्न ठरले होते. मात्र, लॉकडाउनमुळे विवाह करण्यास अडचणी सुरू झाल्या. परंतू, दोन्हीकडील मंडळींनी ठरलेल्या तारखेला लग्न करण्याचा निर्णय घेतला, त्‍याप्रमाणे सोमवारी अतिशय साध्या पद्धतीने सामाजिक अंतर ठेवून व चेहऱ्याला मास्क बांधून केवळ अकरा नागरिकांच्या उपस्थितीत हा विवाह झाला. 

हेही वाचा - Video : कृषी पर्यटनाला कोरोनाची झळ; उद्योग बंदने बिघडला उत्पनाचा ताळेबंद

केवळ अकरा लोकांच्या उपस्थितीत विवाह 
कोरोनाने सर्वत्र थैमान घातल्याने लॉकडाउन व संचारबंदीत काही विवाह सोहळे मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत तोंडाला मास्क बांधून व सामाजिक अंतर ठेवून होत आहेत. असाच एक विवाह सोहळा नियमांचे पालन करत केवळ अकरा लोकांच्या उपस्थितीत साध्या पध्दतीने सोमवारी (ता.१८) साजरा झाला व एका तासात नवरदेवाने नवरीला दुचाकीवर घेऊन गाव गाठले. दुचाकीवरील नवरा, नवरीची वरात पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. 

हेही वाचा - दुचाकीवर बोलत जाणे बेतले जिवावर

नगराध्यक्षा विजयमाला मुळे यांचा पुढाकार 
सोमवारी अतिशय साध्या पद्धतीने सामाजिक अंतर ठेवून व चेहऱ्याला मास्क बांधून केवळ अकरा नागरिकांच्या उपस्थितीत हा विवाह झाला. नवरी नवरदेवला शुभ आशीर्वाद देण्यासाठी शहराच्या नगराध्यक्षा विजयमाला मुळे, उपनगराध्यक्षा वच्‍छलाबाई देशमुख, नगरसेवक गणेश देशमुख, रामभाऊ मुळे यांची उपस्थिती होती. या वेळी अरुण देशमुख, उत्तम वावळे, हरीश घोडे, लक्ष्मण मस्के, जनार्दन वावळे, भिकाजी घोडे, विलास रणखांबे व महाराज यांची उपस्थिती होती. यासाठी नगराध्यक्षा विजयमाला मुळे यांनी पुढाकार घेतला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Bandbaja, No Barat, On Two Wheeler Barat, hingoli news