दिव्यांच्या झगमगाटात हिंगोली झळाळले

राजेश दारव्‍हेकर
सोमवार, 6 एप्रिल 2020

हिंगोली शहरात पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्‍हाभरात एकतेचे दर्शन हिंगोलीकरांनी घडविले. यात फटाक्यांची आतषबाजी करत भारत मातेचा जयघोष करण्यात आला. रविवारी रात्री लाईट बंद करून घरोघरी दिवे लावण्यात आल्याने शहरात दिव्यांचा लख्ख प्रकाश पडला होता. 

हिंगोली : शहरासह जिल्‍हाभरात रविवारी (ता. पाच) रात्री घड्याळाचा काटा नऊवर येताच घराघरातील लाईट बंद झाले व सर्वत्र पणत्या लावण्यात आल्या. त्‍यामुळे शहराला दिवाळीचे स्‍वरूप प्राप्त झाले होते. काही नागरिकांनी फटाक्‍यांची आतषबाजी करीत ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी शहर दणाणून गेले. नऊ मिनिटे शहरात सर्वत्र दिव्यांचा प्रकाश दिसत होता. जिल्‍हाभरातदेखील हीच स्‍थिती होती.

‘कोरोना’ विरोधात लढण्यासाठी कोणीही एकटे नाही, आपण सगळे एकत्र आहोत, असा संदेश देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी घरातील लाईट बंद करून दिवे लावण्याचे आवाहन केले. 

हेही वाचा - हिंगोलीत दोघांचे अहवाल निगेटिव्ह तर दोघांचे प्रलंबित

शहरासह तालुकाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद
या आवाहनाला हिंगोली शहरासह वसमत, कळमनुरी, सेनगाव, औंढा शहरासह तालुकाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कुठे पणती, कुठे टॉर्च तर कुठे मोबाइलची फ्लॅश लाईट लावत सर्वांनी एकतेचे दर्शन घडवले आणि ‘कोरोना’ विरोधातील लढाईचे मनोधैर्य वाढविले. काहींनी नऊ मिनिटे, तर काहींनी १५ मिनिटांपर्यंत घरातील लाईट बंद ठेवत मनामनातील भीतीचा अंधार बाजूला सारला. ग्रामीण भागातदेखील मोठ्या उत्‍साहात नागरिक यात सहभागी झाले होते. जवळा बाजार येथे लाईट बंद करून दिवे लावण्यात आले होते. गिरगाव येथे रविवारी रात्री नऊ वाजता लाईट बंद करून दिवे लावण्यात आले होते. शहरात घरोघरी नागरिकांनी आपल्या अंगणात दिवे लावले होते. तसेच काही युवकांनी रस्त्यावर एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी केली. यामुळे परिसर झळाळून गेला होता.  

हेही वाचा - तीन दिवसांच्या बंदनंतर गर्दीची एकच झुंबड, कुठे ते वाचा...

उत्साही तरुणांची रस्त्यावर फटाक्यांची आतषबाजीही
अंधाररूपी ‘कोरोना’चा नायनाट व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचवलेल्या या उपक्रमात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. चिमुकल्यांनी ‘भारत माता की जय’ तसेच ‘गो कोरोना गो’, एक ज्योत, कोरोनाला हरविण्यासाठी अशा घोषणा दिल्या. काही भागात शुभंकरोतीचे मंजूळ स्वर घुमत होते, तर हिंगोली शहरात काही भागात राष्‍ट्रगीतदेखील म्‍हणण्यात आले. तर काही उत्साही तरुणांनी रस्त्यावर येऊन फटाक्यांची आतषबाजीही केली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingolis flashed in the twinkle of a lamp, hingoli news