World AIDS Day Special : एचआयव्ही बाधितांच्या पोटी प्रसवला आनंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

योग्य उपचाराने एचआयव्हीग्रस्तांना निरोगी अपत्य होते. औरंगाबाद जिल्ह्यात अशा बालकांची संख्या मोठी आहे. दीड वर्षात जिल्ह्यात केवळ एकच मुल एचआयव्ही बाधित म्हणून जन्माला आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. 

औरंगाबाद - नियमित एआरटी सेंटरचा उपचार घेणाऱ्या एचआयव्हीबाधित गर्भवती महिलांच्या प्रसूतीनंतर त्यांच्या पाल्यात संसर्गाचे प्रमाण नगण्य होत चालले आहे. गेल्या दीड वर्षात केवळ एकाच मुलाला संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे एचआयव्हीची चाचणी प्रत्येकाने करून घेऊन नियमित औषधोपचार घेतल्यास संसर्गाची भीती संपून आयुष्य वाढते, असा
सल्ला मेडिसीन व एआरटी सेंटरच्या प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दिला. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एआरटी प्लस सेंटरमध्ये ऑक्‍टोबर 2019 अखेर 10 हजार 953 रुग्णांची नोंदणी झाली. त्यापैकी 5,965 पुरुष, 4,188 महिला, 12 स्थलांतरित, लहान मुले 472 तर 315 लहान मुलींचा समावेश आहे. यापैकी फर्स्ट लाइनचे 4,108, सेकंड लाइनचे 360 तर 64 थर्डलाइनचे उपचार घेत असल्याची माहिती डॉ. मधुकर साळवे यांनी दिली. या केंद्रामार्फत कायम जनजागृती व प्रबोधनपर कार्यक्रम सुरू असतात. शिवाय तीन डॉक्‍टर, तीन कौन्सिलर, दोन डाटा एन्ट्री मॅनेजर, दोन टेक्‍निशियन, फार्मासिस्ट, कम्युनिटी कोऑर्डिनेटर असा 12 लोकांचा स्टाफ काम करत असल्याचेही ते म्हणाले. औषधोपचार अतिशय महागडा आहे. तो मोफत केल्या जातो.

काय सांगता ? - एचआयव्हीच नव्हे तर शरीर संबंधातून होतात हे दहा गंभीर आजार

नियमित औषध घेणारे गेल्या सात वर्षांपासून रुग्ण येत असून, त्याचे दैनंदिन आयुष्यही सुरळीत सुरू असल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले. वर्षभरात केंद्रातून उपचार घेणाऱ्या 31 महिला प्रसूतीपूर्व उपचार घेत आहेत. त्यांच्या अपत्यांची जन्मापूर्वी, जन्म झाल्यावर, त्यानंतर दीड महिन्याने, सहा महिन्याने, दीड वर्षाने अशा तपासण्या केल्या जातात. त्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर ते पुण्याच्या नारी संस्थेकडे पाठवल्या जातात. त्यानंतर ते संबंधित केंद्राकडे येतात, असे डॉ. साळवे म्हणाले. 

प्रतिरुग्ण वार्षिक उपचार खर्च 
फर्स्टलाइन पाच हजार रुपये 
सेकंड लाइन 35 हजार रुपये 
थर्डलाइन 1 लाख रुपये 

 
हे टाळा 
 

एचआयव्हीग्रस्त रुग्णाच्या मानसिकतेवर झालेल्या संशोधनात अचानक येणारा मानसिक दबाव, भीती, पश्‍चात्ताप, दुःख, राग, काळजी, मानसिक खिन्नता आढळून आले आहे. त्यामुळे स्वतःच्या मनातील विचारांना योग्य आकार द्या. स्वतःच्या मनाला योग्य मार्ग दाखवून सकारात्मक बदल घडवा व ते बदल कायम ठेवा. श्‍वासावर नियंत्रण मिळवण्याचा सल्लाही डॉ.
भट्टाचार्य यांनी दिला.  
 

उघडून तर पाहा -  मृत्यू होतो म्हणजे नेमके काय होते? कसे येते मरण, वाचा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HIV-positive parents have an HIV-negative child