‘भाऊ’, ‘दादां’ना चाप लावण्यासाठी धोरण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - शहरातील प्रमुख रस्ते, चौकांमध्ये बेकायदा होर्डिंग लावणाऱ्या ‘भाऊ’-‘दादां’ना कायमस्वरूपी चाप लावण्यासाठी महापालिका लवकरच धोरण निश्‍चित करणार आहे. यापुढे कोणतेही होर्डिंग केवळ एका दिवसापुरतेच लावता येईल व त्याच्या जागाही निश्‍चित करून दिल्या जाणार आहेत. याबाबतचा धोरणात्मक प्रस्ताव लवकरच सर्वसाधारण सभेसमोर येणार आहे.  

बेकायदा होर्डिंग्जमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. प्रमुख रस्ते, चौक व गल्लीबोळातही भाऊ-दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक लावले जात असून, याविरोधात कारवाई करण्याचे न्यायालयाने वारंवार आदेश दिले आहेत. न्यायालयाने या प्रकरणी अवमान कारवाई करण्याची तंबी दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून बेकायदा होर्डिंग्जच्या विरोधात मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर आता होर्डिंग्ज आणि बॅनरबाबत नवीन धोरण आणण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. 

महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी सांगितले, की इंदूरच्या धर्तीवर शहरात होर्डिंग्ज आणि बॅनरबाबतचे धोरण लागू करण्यात येईल. सध्या चौकांत, रस्त्यातील कमानींवर कुठेही होडिंग्ज आणि बॅनर लावले जातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. नवीन धोरण लागू झाल्यावर होर्डिंग्ज, बॅनरच्या जागा महापालिकाच ठरवून देईल; तसेच त्यासाठी एक दिवसाची परवानगी घ्यावी लागेल. एका दिवसानंतर ते काढून घ्यावे लागेल. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात भर पडेल, तर दुसरीकडे शहराचे विद्रुपीकरणही होणार नाही. याबाबतचा प्रस्ताव लवकरच सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. 

कारवाईनंतरही नाही धाक 
महापालिकेने शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनरविरोधात २८ जुलैपासून मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार आतापर्यंत तब्बल आठ हजार बॅनर, होर्डिंग्ज काढले आहेत; मात्र अनेक भागांत अद्यापही होर्डिंग्ज, बॅनर्स लावण्यात येत आहेत.

Web Title: Hording Banner Issue Municipal crime