रुग्णालयामार्फत अपंगांना ऑनलाइन प्रमाणपत्र द्यावे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

उपजिल्हा रुग्णालयामार्फत अपंगत्वाचे प्रमाणपत्र अपंगांना ऑनलाइन देण्याबाबतचा प्रस्ताव संबंधितांकडे पाठविला जाईल. त्यांची मान्यता मिळताच ही व्यवस्था केली जाईल.
- डॉ. मंडलेचा, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, परळी.

परळी वैजनाथ - येथील उपजिल्हा रुग्णालयामार्फत अपंगांना ऑनलाइन प्रमाणपत्राचे वितरण करावे, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे राज्य समन्वयक डॉ. संतोष मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. पारस मंडलेचा यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

परळी शहर व तालुक्‍यातील अपंगांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अंबाजोगाई, बीड येथे जावे लागते. या ठिकाणी त्यांची हेळसांड होते. वेळेवर प्रमाणपत्र मिळत नाही. याचा विचार करून येथील उपजिल्हा रुग्णालयात अपंगांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र ऑनलाइन देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी सोमवारी (ता. चार) अपंग प्रहार संघटनेचे राज्य समन्वयक डॉ. संतोष मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मंडलेचा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी आलेल्या अपंग रुग्णांना रांगेत न थांबवता, त्यांची तपासणी व औषधोपचारासाठी वेगळी व्यवस्था करावी अशी मागणीही निवेदनात केली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा डॉ. संतोष मुंडे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते साजन लोहिया, सय्यद सुभान, रंजित रायभोळे, आनंद लोखंडे, संतोष बल्लाळ, संतोष आघाव, नागनाथ सावजी, संजय नखाते, राम काकडे, विमल निलंगे, नागनाथ सोळंके, महादेव सोळंके, शेख कादर, शेख महेमूद, शेख फरजाना, सुधाकर सूर्यवंशी, गौतम रायभोळे, अर्चना आमले, सुनीता कौले, विमल धुमाळ आदींनी दिला आहे.
 

Web Title: From hospital effort to give online certificate

टॅग्स