
जिल्ह्यात शंभर टक्के डिजिटल शाळचे उद्दिष्ट पूर्ण असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. मात्र, काही शाळेत इंटरनेटची सुविधा असतानाही विजेअभावी अडचणी आहेत. कोरोनामुळे नवीन शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार याची वेळ अद्याप निश्चित झालेली नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण द्यायचे कसे ?, असा प्रश्न निर्माण होत आहे.
हिंगोली : विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. त्यानुषंगाने दीक्षा ॲप डाउनलोड करण्याच्या सूचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. मात्र, बहुतांश शाळेत इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे ई लर्निगची संकल्पना प्रभावीपणे कशी राबविली जाणार, असा प्रश्न पालकांसह विद्यार्थ्यांना पडला आहे.
जिल्ह्यात एकूण एक हजार २८ प्राथमिक शाळा आहेत. यात शासकीय एक, जिल्हा परिषदेच्या ८४८, अनुदानित ८३, विनाअनुदानित ९६ शाळांचा समावेश आहे. यात हिंगोली तालुक्यात २१७, सेनगाव १७८, वसमत २३५, कळमनुरी २२४, औंढा नागनाथ १७४ शाळा आहेत. शाळेत पाच हजार १४२ शिक्षक कार्यरत आहेत, तर एक लाख २७ हजार २५९ विद्यार्थी संख्या आहे.
हेही वाचा - लॉकडाउनमध्ये दीड लाख लाभार्थींना ‘शिवभोजन’चा आधार
६४० शाळांत विद्युत सुविधा
यात हिंगोली तालुक्यात ३२ हजार ३७५, सेनगाव १९ हजार ४९४, वसमत ३१ हजार ६१८, कळमनुरी २३ हजार ७६५, औंढा नागनाथ २० हजार सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शाळा इ लर्निंग करण्यासाठी शासन पुढाकार घेत आहे. त्यानुषंगाने विद्युत सुविधा असलेल्या ६४० शाळा आहेत.
औंढा तालुक्यात ११० शाळा
यात हिंगोली तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ८२, अनुदानित २३, विनाअनुदानित ३२, अशा एकूण १३८, सेनगाव तालुक्यात जिल्हा परिषद ७२, अनुदानित ११, विनाअनुदानित सहा, अशा एकूण ८९, वसमत तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १०४, अनुदानित २५, विनाअनुदानित २५, अशा एकूण १५४, कळमनुरी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ११७, अनुदानित १४, विनाअनुदानित १८, अशा एकूण १४९, औंढा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ८९, अनुदानित दहा, विनाअनुदानित ११, अशा एकूण ११० शाळांचा समोवश आहे.
२८७ माध्यमिक शाळेत विद्युत सुविधा
तसेच जिल्ह्यात माध्यमिक शाळांची संख्या ३०३ आहे. यात शासकीय सात, जिल्हा परिषदेच्या ३१, अनुदानित १३४, विनाअनुदानित १३१ शाळांचा समावेश असून शिक्षकांची संख्या तीन हजार ४०६ आहे. तर एक लाख ११ हजार ५०२ विद्यार्थी आहेत. यापैकी २८७ शाळेत विद्युत सुविधा उपलब्ध आहे.
शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार याकडे लक्ष
जिल्ह्यात शंभर टक्के डिजिटल शाळचे उद्दिष्ट पूर्ण असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. मात्र, काही शाळेत इंटरनेटची सुविधा असतानाही विजेअभावी अडचणी आहेत. कोरोनामुळे नवीन शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार याची वेळ अद्याप निश्चित झालेली नाही. दरवर्षी पंधरा जूनला सुरू होणारे शैक्षणिक वर्ष या वर्षी पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.
दीक्षा ॲपद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे
जिल्ह्यात ८५ टक्के पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली आहेत. ती शाळा स्तरावर पोचती केली जाणार आहेत. कोरोनाच्या प्रार्श्वभूमीवर ई-लर्निंग उपक्रम राबविण्याचे शासनाने ठरविले आहे. लोकसहभागातून अनेक शाळा डिजिटल झाल्या. मात्र, या शाळेत ई- लर्निंगसाठी लागणाऱ्या आवश्यक यंत्रणेचा तुटवडा आहे. दीक्षा ॲपद्वारे विद्यार्थ्यांना व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे देण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाचा आहे.
येथे क्लिक करा - जात पाहून पीककर्ज देणार का ? शेतकरी संतप्त
वीजबिल ग्रामपंचायतीने भरावे
ज्या पालकांकडे मोबाइलची सुविधा आहे त्यांना दीक्षा ॲप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले आहे. डिजिटल शाळेत वीजजोडणी आहे. मात्र, वीजबिलाचा प्रश्न असल्याने अडचणी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे कसे द्यायचे, असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष तथा शिक्षण समितीचे निमंत्रित सदस्य सुभाष जिरवणकर यांनी शाळेतील वीजबिल ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगातून भरावे, अशी मागणी केली आहे.
शासनाच्या नियमाप्रमाणे कामे केली जाणार
शासनाने दिलेल्या सुचनेप्रमाणे दीक्षा ॲप डाउनलोड करून शिक्षकांनी त्याप्रमाणे पालकांचे ग्रुप तयार केले आहेत. साठ टक्के पालकांकडे स्मार्ट फोन आहेत. ज्यांच्याकडे नाहीत त्यांनी ते घेण्याचे आवाहनदेखील केले आहे. दरवर्षी शाळा पंधरा जूनला सुरू होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले नाही. शाळा सुरू झाल्यानंतर शासनाच्या नियमाप्रमाणे कामे केली जाणार आहेत.
-संदीप सोनटक्के, शिक्षणाधिकारी, प्राथमिक