जात पाहून पीककर्ज देणार का ? शेतकरी संतप्त

file photo
file photo

हिंगोली : खरीप हंगामासाठी बँकानी पीककर्ज वाटपास सुरवात केल्याने शेतकरी अर्ज भरण्यासाठी धावपळ करीत आहेत. भारतीय स्‍टेट बँकने तयार केलेल्या अर्जावर जातीचा उल्‍लेख करण्यात आल्याने शेतकऱ्यांतुन नाराजी व्यक्‍त केली जात असून हा रकाना काढून टाकावा, अशी मागणी केली जात आहे.  

जिल्‍ह्यात यावर्षी एक हजार १६८ कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्‍ट आहे. सध्या शेतकऱ्यांना सात कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. जून महिण्याच्या सुरवातीपासून सलग तीन दिवस जिल्‍ह्यात पाऊस झाल्याने खरीपाच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे. 

अर्ज भरण्यासाठी धावपळ

काही दिवसांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन केल्याने शेतकऱ्यांना बियाणे, खते घेण्यासाठी अडचणी येत होत्या. त्‍यानंतर यात शिथीलता देण्यात आल्याने शेतकरी खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. तसेच पीककर्जाचे अर्ज भरण्यासाठी देखील धावपळ सुरू झाली आहे. जिल्‍ह्यात पीक कर्जाचे अर्ज भरण्यासाठी भारतीय स्‍टेट बँकने शेतकऱ्यांसाठी अर्ज तयार केला आहे. 

स्‍वाभीमानी शेतकरी संघटनेचे निवेदन

या अर्जावर शेतकऱ्यांचे नाव, गाव, वार्षिक उत्‍पन्न, कुटुंबातील सदस्य संख्या मोबाईल क्रमांकाची माहिती द्यावी लागणार आहे. मात्र, यात जातीचाही उल्लेख आहे. जातीचाही रकाना भरावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्‍त केली जात आहे. जात पाहून कर्ज दिले जाणार का? अशी चर्चा शेतकऱ्यांतून केली जात आहे. दरम्‍यान, या बाबत स्‍वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे सेनगाव तहसील कार्यालयात निवेदन दिले असून पीककर्जाच्या अर्जावरील जातीचा रकाना काढून टाकावा, अशी मागणी रावसाहेब अडकिणे, नामदेव पतंगे यांनी केली आहे. 

चार हजार क्विंटल हळदीची आवक

हिंगोली : येथील कृषी उत्‍पन्न बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात शुक्रवारी (ता.पाच) चार हजार क्‍विंटल हळदीची आवक झाली. हळदीला ४८०० ते ५२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा भाव मिळाला. हिंगोली येथील भुसार मार्केटमध्ये हरभऱ्याची ११०० क्‍विंटल आवक झाली होती. हरभरा प्रतिक्‍विंटल ३९०० ते ३९५० रुपयांचा दर मिळाला. दोन दिवसापूर्वी भूईमुगाची चारशे क्‍विंटल आवक झाली होती. 

शेतमाल विक्रीसाठी दाखल

भुईमुगाला ४६५० ते ५११५ रुपये प्रतिक्‍विंटलचा भाव मिळाला. तुरीची तिनशे क्‍विंटल आवक झाली होती. तुरीला ४८०० ते ५३०० रुपये प्रतिक्‍विंटलचा भाव मिळाला होता. लॉकडाउन शिथील झाल्याने शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणला आहे. तसेच खरीप हंगाम जवळ आल्याने बियाणे, खते खरेदीसाठी शेतमालाची विक्री केली जात आहे. काही दिवसांपासून बाजार समिती व भुसार मार्केटमध्ये शेतमालाची आवक वाढल्याचे सांगण्यात येत आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com