व्हॉटसअॅपद्वारेच विद्यार्थी घेतात अभ्यासाचे धडे  

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 April 2020

प्रत्येक विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित साहित्य विद्यार्थ्यांना व्हॉट्‍सअप ग्रुपवर दिल्या जात आहे. एवढेच नाहीतर महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा व रोजगार मार्गदर्शन विभागांतर्गत स्पर्धा परीक्षेचेही मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने केले जात आहे.  

नांदेड :  हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या वतीने लाॅकडाऊनच्या कालावधीमध्ये आॅनलाईन व विविध अॅपच्या  माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येत आहे. प्राचार्या डॉ. उज्ज्वला के. सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु आहे. 

कोरोनामुळे शासनाच्या वतीने तातडीने शाळा, महाविद्यालये बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षाही अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या. मात्र, या काळामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी व त्यांच्या निरंतर चालणाऱ्या अभ्यासामध्ये खंड पडू नये म्हणून हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या वतीने दोन टप्प्यात अभ्यासक्रमाचे नियोजन केले आहे.  

हेही वाचा - Video : वर्तमानपत्र वाचनाच्या भूकेकडून समाधानाकडे

विषयनिहाय विद्यार्थ्यांचा केला ग्रुप
सर्वप्रथम दिनांक २५ मार्चपर्यंत प्राध्यापकांना महाविद्यालयात न येण्याचे आदेश प्राचार्या डॉ. सदावर्ते यांनी दिले. त्यामुळे प्राध्यापकांनी त्या काळात विद्यार्थ्यांचे विषयनिहाय विद्यार्थ्यांची यादी तयार करून ग्रुप स्थापन केला. त्यावर विद्यार्थ्यांना परीक्षा सत्राचे तसेच प्रात्यक्षिक परीक्षा संदर्भात मार्गदर्शन करायला सुरुवात केली. नंतर लॉकडावूनचा कालावधी वाढल्यामुळे प्राध्यापकांनी व्हर्चुअल क्लासरूमचा तसेच विषया संदर्भाचे शैक्षणिक व्हिडिओ विद्यार्थ्यांना विविध अॅपच्या माध्यमातून शेअर केली जात आहे.    

असा आहे उपक्रम
प्राध्यापकांनी आपापले पेपरचे अभ्यासक्रम हे ई-मेल, व्हॉट्सअॅप ग्रुप, यूट्यूब, गुगल क्लास रूम, तसेच ‘यडमोडो साॅप्टवेअर’द्वारे विद्यार्थ्यांना पेपर वाईज नोट्स, क्रमिक पुस्तके, व्हिडीओ द्यायला सुरुवात केली. तसेच एस.ई.सी. कौशल्य अभ्यासक्रमावरही विशेष लक्ष देऊन प्रश्नोत्तरासह त्यांच्या अनेक समस्यांचे समाधान करण्यात येत आहे.  याशिवाय विद्यार्थ्यांना अनेक वेगवेगळ्या शैक्षणिक कृतिशील उपक्रमातून कविता, क्रमिक पुस्तके वाचन करण्यासाठी ‘पीडीएफ’ पुस्तके शेअर केली जात आहेत. प्रिंट मीडिया, रेडिओ, दूरदर्शन, विज्ञापन आदी कौशल्य प्रकल्प लेखन अभ्यासक्रमावर आधारित साहित्य विद्यार्थ्यांना दिल्या जात आहे. महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा व रोजगार मार्गदर्शन विभागांतर्गत स्पर्धा परीक्षेचेही मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने केले जात आहे.  

विद्यार्थ्यांची अडचण होवू नये म्हणून उपक्रम
विद्यापीठाच्या २४ मार्च पासून स्हाुरु होणाऱ्या पदवीच्या परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.  तोंडावर परीक्षा येऊन ठेपल्याने विद्यार्थी प्राध्यापकांकडून अभ्यासक्रमाचे साहित्य घेऊन अभ्यासाच्या तयारीत होते. मात्र, लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद झाल्याने विद्यार्थ्यांचा संपर्क तुटला. विशेष करून अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचणी येऊ नये म्हणून हा उपक्रम राबवत आहोत.
- प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students Study Lessons Through WhatsApp Nanded News