आरटीओ कार्यालयाचे कसे होणार? 

अनिल जमधडे 
गुरुवार, 20 एप्रिल 2017

औरंगाबाद - आरटीओ कार्यालयात नजीकच्या काळात महत्त्वाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती, बदल्या होणार आहेत. त्यामुळे कार्यालयातील अनेक पदे रिक्त राहणार असल्याचे संकेत आहेत. नुकतीच काहीशी घडी बसलेल्या आरटीओ कार्यालयात पुन्हा पोकळी निर्माण होणार असल्याने संभाव्य वर्कलोड बघता, अधिकारी व कर्मचारी अक्षरश: धास्तावले आहेत. 

औरंगाबाद - आरटीओ कार्यालयात नजीकच्या काळात महत्त्वाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती, बदल्या होणार आहेत. त्यामुळे कार्यालयातील अनेक पदे रिक्त राहणार असल्याचे संकेत आहेत. नुकतीच काहीशी घडी बसलेल्या आरटीओ कार्यालयात पुन्हा पोकळी निर्माण होणार असल्याने संभाव्य वर्कलोड बघता, अधिकारी व कर्मचारी अक्षरश: धास्तावले आहेत. 

ढिसाळ, दलाली, वेळकाढू कारभारामुळे अनेकजण वाहन परवाने काढण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडे फिरकतही नाहीत. मात्र, प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी पदभार घेतल्यानंतर काही प्रमाणात सुधारणा करण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या सकारात्मक कामकाजाने राज्यातील पहिले संपूर्ण संगणकीय व ऑनलाईन कार्यालय असा मान या कार्यालयाला मिळाला आहे. दरम्यान, प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके हे जूनअखेर सेवानिवृत्त होत आहेत. कार्यालयीन अधीक्षक श्री. गांगुर्डे हेही मेअखेर सेवानिवृत्त होत आहेत. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांची पदोन्नती होणार असल्याने ते आताच सुटीवर गेले आहेत. ते परत येतील अशी शक्‍यता नाही. सहायक प्रादेशिक परिहवहन अधिकारी किरण मोरे यांची धुळे येथे बदली झालेली आहे; मात्र वर्कलोड लक्षात घेऊन त्यांना पदमुक्त केलेले नाही. ते दररोज आपली कार्यमुक्ती होईल याची वाट पाहत आहेत. दुसरीकडे जालना येथून प्रतिनियुक्तीवर आलेले सहायक परिवहन अधिकारी श्री. जायभाये यांची चौकशी सुरू असल्याने ते आस्थापनेवर असले; तरीही प्रत्यक्ष कार्यालयात नाहीत. सर्वसाधारणतः बदल्या मार्च ते मे यादरम्यान होतात. त्यानंतर कार्यालये रिक्त होण्याच्या धास्तीने कर्मचारी-अधिकारी हैराण आहेत. त्यातच औरंगाबादेत येण्यासाठी कुणीही तयार होत नाही असा आतापर्यंतचा इतिहास आहे. 

सर्वसाधारण बदल्यांच्या काळात परिवहन विभागाच्या औरंगाबाद आस्थापनेवर सर्व अधिकारी कार्यरत असल्याचे दिसणार आहे. बदल्यांचा काळ पूर्ण झाल्यानंतर एकापाठोपाठ विभागातील अधिकारी पदे रिक्त होणार असल्याने परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांचे मुख्य पद तसेच कार्यालयीन अधीक्षक श्री. गांगुर्डे यांचेही पद कदाचित पुढचे वर्षभर रिक्त राहण्याची शक्‍यता आहे. उपप्रादेशिक अधिकारी आस्थापनेवर कार्यरत असले, तरीही ते त्यांना मुळात औरंगाबादेत काम करण्याचा उत्साह नसल्याने त्यांचे पदही रिक्त राहू शकते. सहायक अधिकारी किरण मोरे बदली झालेले असल्याने त्यांनाही नियमाप्रमाणे जावेच लागणार असल्याने हेही पद रिक्त राहणार आहे. म्हणजेच येत्या काळात प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि दोन सहायक परिवहन अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक यांची पदे रिक्त राहण्याची शक्‍यता असल्याने आरटीओ कार्यालयात अस्वस्थता पसरली आहे. तिसरे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते हे नुकतेच आलेले असल्याने त्यांना मात्र पुढची तीन वर्षे राहावे लागणार आहे; मात्र रिक्त अधिकाऱ्यांचा पदभार त्यांच्यावर पडण्याची शक्‍यता आहे. 

बीड, जालन्याची स्थितीही वाईटच 
प्रादेशिक परिवहन कार्यालया अंतर्गत बीड येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. खान यांची जालना येथे बदली झाली आहे. येथील सहायक परिवहन अधिकाऱ्याचे पद अगोदरच रिक्त आहे. सध्या केवळ पाच - सहा मोटार वाहन निरीक्षकांवर कामकाज सुरू आहे. जालना येथेही स्थितीही वाईट आहे. बीड येथून बदलून आलेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी खान जालन्यात रुजू झालेले नाही तर सहायक परिवहन अधिकारी श्री. शेख हेही येत्या काळात सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे बीड आणि जालना या दोन्ही महत्त्वाच्या शहरात महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची वाणवा राहणार आहे. 

Web Title: How will the RTO office?