coronavirus - माणुसकी अजून जिवंत आहे... 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 March 2020

  • निराधार, निराश्रीत, मजूर, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सरसावले अनेक हात 
  • प्रशासनाकडूनही निराधारांची सोय 

बीड - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन पातळीवर अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यातील सर्वात महत्वाची म्हणजे संचारबंदी आणि लॉक डाऊन. पण, यामुळे मजूर, निराधार, निराश्रीत, रुग्णांचे नातेवाईक यांच्या जेवणाचीच भ्रांत निर्माण झाली होती. अनेकांचे नातेवाईक रुग्णालयात आहेत; परंतु वाहतूक बंद, हॉटेल बंद यामुळे त्यांच्या जेवणाचे वांदे झाले होते. परंतु, यासाठी समाजातून अनेक हात पुढे येत आहेत. 

चारशे नातेवाईकांच्या महिनाभराचा जेवणाचा प्रश्न सुटला 
अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचे तीन दिवसांपासून जेवणाचे हाल सुरु होते. मात्र, आमदार नमिता मुंदडा यांनी यासाठी पुढाकार घेतल्याने चारशे नातेवाईकांना महिनाभर जेवणाची सोय झाली आहे. यासाठी लागणारा किराणा गुरुवारी ज्येष्ठ नेते आणि त्यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा यांनी रुग्णालय प्रशासनाला सुपूर्द केला. 

हेही वाचा - अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिरातील दर्शन बंद, फक्त पुजाऱ्यांना प्रवेश

नंदकिशोर मुंदडा यांनी स्वत:चे दिड लाख रुपये व त्यांच्या ताब्यातील बाजार समितीने दिड लाख रुपये दिले. यातून ४०० व्यक्तींसाठी महिनाभर चहा, नाश्ता आणि दोन वेळेसच्या जेवणासाठीचे गहू, तांदूळ, डाळ, तेल, मसाला, साखर, चहापत्ती, पोहे आदी किराणा सामान खरेदी करुन ते स्वाराती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्याकडे सुपूर्द केले. नंदकिशोर मुंदडा, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, सभापती मधुकर काचगुंडे, डॉ. संदीप थोरात, ॲड. जयसिंग चव्हाण, व्यापारी राजेश भन्साळी, वैजनाथ देशमुख, ॲड. संतोष लोमटे, अभिजीत गाठाळ आदी उपस्थित होते. 
हेही वाचा -  साखरपुड्यात विवाह उरकून एक लाख दिले मुख्यमंत्री निधीत

प्रशासनाकडूनही ४५ निराधारांना आश्रय; १८० लोकांच्या जेवणाची सोय 
संचारबंदीच्या सुरुवातीलाच जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांनी निराधारांची सोय सामाजिक न्याय विभागामार्फत केली जाईल, त्यांची माहिती कळविण्याचे आवाहन केले होते. आतापर्यंत ४५ निराधारांना आश्रय दिला आहे. शुक्रवारी (ता. २७) परळीतील वैद्यनाथ मंदीर परिसरातील भिक्षुक, बेवारस अशा १६ वृद्धांची सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी व त्यांच्या पथकाने घाटनांदूर येथील वृद्धाश्रमात त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय केली आहे. बीड व परिसरातील पाल ठोकून राहणाऱ्या १८० लोकांच्या जेवणाचीही त्यांनी सोय केली आहे. विशेष म्हणजे मानसिक संतुलन ढासळलेल्यांना आंघोळ घालून त्यांचे केस कापण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Humanity is even more alive