अंबाजोगाईतील हौशी छायाचित्रकारांची अशीही माणुसकी, वन्यपक्ष्यांना पाणी व चाऱ्याचा आधार  

प्रशांत बर्दापूरकर 
Monday, 4 May 2020

अंबाजोगाई शहराच्या उत्तरेस मुकुंदराज परिसरात वनजमीन आहे. या वनात मोर, लांडोर यासह विविध प्रजातींचे पक्षी रहिवास करतात. सकाळी सूर्योदयाला या परिसरात फेरफटका मारला तर सर्वत्र विविध पक्ष्यांचा किलबिलाट, मोरांचे आवाज कानी पडतात.

अंबाजोगाई (जि. बीड) - लॉकडाउनच्या काळात विविध संस्था व दानशूर गरजू व भुकेल्यांना अन्नधान्य पुरवतात; परंतु वनात राहणारे पक्षी व प्राण्यांना पाणी व चारा कोण पुरवणार, असा प्रश्न निर्माण होतो. याची जाणीव ठेवत येथील काही हौशी छायाचित्रकार या उन्हाळ्यात नित्याने दररोज मुकुंदराज परिसरातील वन्य पक्ष्यांना पाणी, अन्न व चारा देऊन कृतज्ञता व्यक्त करत आहेत. 

अंबाजोगाई शहराच्या उत्तरेस मुकुंदराज परिसरात वनजमीन आहे. या वनात मोर, लांडोर यासह विविध प्रजातींचे पक्षी रहिवास करतात. सकाळी सूर्योदयाला या परिसरात फेरफटका मारला तर सर्वत्र विविध पक्ष्यांचा किलबिलाट, मोरांचे आवाज कानी पडतात. या पक्ष्यांसह हरीण, काळवीट, कोल्हे, नीलगाय असे प्राणीही या परिसरात आहेत. 
उन्हाळ्यात या परिसरात पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची वानवा असल्यामुळे हे तीन महिने माणसांनीच या पक्ष्यांचा आधार होण्याची गरज आहे. त्यानुसार पक्षीमित्रांनी ही जाणीव जागृत करत माणुसकी जपल्याने पशुपक्ष्यांना काही प्रमाणात आधार मिळत आहे. 

हेही वाचा - युरोपात जर्मनीनेच रोखला मृत्युदर, सर्वाधिक चाचण्या, वेळेत उपचार

दररोज सकाळी हे पक्षी अन्न व पाण्याच्या शोधात बाहेर पडतात. इतर वन्यप्राणी जरी जवळ दृष्टीस पडत नसले तरी हरणांचे कळप मात्र दूरवरून दिसतात. पक्ष्यांचा राजा म्हणून संबोधले जाणारे मोर अन्नधान्य टाकल्याबरोबर त्यावर तुटून पडतात. इतर पक्षीही मनुष्य दूर गेल्यास या धान्याचा आस्वाद घेतात. येथील हौशी छायाचित्रकार मुन्ना सोमाणी व कमलेश पधारिया हे निसर्गचित्र व पक्ष्यांची छायाचित्रे टिपण्यासाठी तांबडं फुटायलाच मुकुंदराज परिसर गाठतात. परंतु सध्या ते फक्त कॅमेराच नव्हे तर गहू, ज्वारी, तांदूळ, काही डाळी आणि पाण्याचे कॅन सोबत घेऊन जातात.

हेही वाचा - युरोपातील सर्व देशांनी आता संयुक्त कृती करावी - डॉ. जॉन कार्लोस

तिथे गेल्यावर बरोबर झाडीत मोकळी जागा असलेल्या ठिकाणी हे अन्नधान्य टाकतात. थोडे बाजूला जाऊन बसताच पक्षी या अन्नाचा आस्वाद घेतात. या परिसरात वन विभागाने पक्षी व प्राण्यांसाठी पाणवठे केलेले आहेत. त्यात हे पक्षीमित्र सोबत आणलेल्या कॅनमधील पाणीही टाकतात. सध्या मुकुंदराज मंदिर व वन विभागाच्या उद्यानात पाण्याची सोय असल्याने तेथील पाणी या पक्ष्यांची तहान भागवत आहे. फक्त ते पाणवठ्यापर्यंत पोचवावे लागते. या पक्षीमित्रांसह निसर्गप्रेमी व युवा संघर्षचे युवक कार्यकर्तेही यात योगदान देतात. 

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

निसर्गाने नटलेला परिसर 
मुकुंदराज, बुट्टेनाथ, नागनाथ, घोडदरी हा डोंगरदऱ्यांचा हा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. सध्या रखरखत्या उन्हामुळे हिरवाई नसली तरी, काही ओसाड डोंगर वगळता, वृक्षवल्ली व खोल दऱ्याखोऱ्या आणि ओढ्यांमुळे याला निसर्गवैभव प्राप्त झालेले आहे. पावसाळ्यात व हिवाळ्यात या परिसराला हिरवाईच्या सौंदर्याचे अलंकार चढलेले असतात. त्यामुळे विविध पक्षी व प्राणी या परिसरात रहिवास करतात. या परिसरातून वाण नदीही मार्ग काढते. त्यामुळेच काही प्रमाणात पक्षी व वन्य प्राण्यांची तहान भागते. नदीकाठी रहिवासाचाही आधार होतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The humanity of the photographers in Ambajogai