पतीने पत्नीच्या डोक्यात घातले कुकर, बीड जिल्ह्यातील घटना, खुनाचा गुन्हा नोंद

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

जेवत असताना झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि पती रामेश्वर प्रकाश तौर याने त्याची पत्नी सारिका तौर (वय २४) हिच्या डोक्यात कुकर घातल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली.

माजलगाव (बीड) - जेवण करीत असताना झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि पती रामेश्वर प्रकाश तौर याने त्याची पत्नी सारिका तौर (वय २४) हिच्या डोक्यात कुकर घातल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेनंतर पती स्वतःहून शहर पोलिस ठाण्यात हजर होऊन पत्नीने आत्महत्या केल्याचे सांगत होता; परंतु पोलिसांनी घटनेची माहिती घेत खुनाचा गुन्हा दाखल केला. 

येथील व्यापारी अशोक सक्राते यांची मुलगी सारिका हिचा मागील चार वर्षांपूर्वी रामेश्वर तौर याच्याशी विवाह झाला होता. हे दांपत्य शहरानजीक असलेल्या भाटवडगाव वस्तीत त्यांच्या कुटुंबासह राहतात. शनिवारी (ता. २०) रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान जेवण करीत असताना त्याचे त्याची पत्नी सारिका हिच्यासोबत कडाक्याचे भांडण झाले. यातच रामेश्र्वरने रागाच्या भरात सारिकाच्या डोक्यात कुकरचे भांडे मारल्याने तिचा जागीच मृत्यू झाला; परंतु रामेश्‍वरने खून पचवण्याच्या उद्देशाने पत्नी सारिकाने ओढणीने गळफास घेतल्याचा बनाव केला. यावर त्याने शहरातील एका खासगी हॉस्पिटल येथे आणले; परंतु डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगून पोलिसांना याबाबत कळविले.

हेही वाचा - विनयभंगप्रकरणी बीडमधील आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी

पत्नीचा मृत्यू झाल्याचे कळताच रामेश्वर स्वतःहून शहर पोलिस ठाण्यात आला व पत्नीने आत्महत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला व ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केले. यावेळी सारिकाच्या डोक्यात मार असल्याचे दिसून आले. त्यामुळे हा प्रकार वेगळाच असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. सारिकाचे वडील अशोक सक्राते यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अविनाश राठोड करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband puts cooker in wife's head, incident in Beed district, murder case recorded