पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा

गणेश पांडे
Saturday, 19 December 2020

पती लक्ष्मण काशीनाथ चांडाळ हा पत्नी कांचन हिच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेत असे. किरकोळ कारणावरून तिला शिवीगाळ करून मारहाण करण्यात येत होती. ता. ११ ऑगस्ट २०१८ रोजी गर्भवती असलेल्या पत्नी कांचन हिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला.

परभणी - पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेऊन ती गर्भवती असताना तिचा खून करणाऱ्या पतीला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश सी. एम. बागल यांनी शनिवारी (ता. १९) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

पूर्णा पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पती लक्ष्मण काशीनाथ चांडाळ हा पत्नी कांचन हिच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेत असे. किरकोळ कारणावरून तिला शिवीगाळ करून मारहाण करण्यात येत होती. 

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांना कामातील कामचुकारपणा भोवणार 

डोक्यात दगड घालून खून
एके दिवशी ता. ११ ऑगस्ट २०१८ रोजी गर्भवती असलेल्या पत्नी कांचन हिच्यासोबत लक्ष्मणने वाद घातला. तिला शिवीगाळ केली तसेच मारहाण करून तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. या प्रकरणी कांचन हिचे मामा ज्ञानोबा काशीद यांनी पूर्णा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पती लक्ष्मण चांडाळ यानेच पत्नी कांचनचा खून केल्याचे असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. मामाच्या तक्रारीवरून पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेड : दामिनी पथकाकडून गांजा जप्तीची कामगिरी, ग्रामीणचे गुन्हे शोध पथक तोंडघशी 

दोषारोप पत्र दाखल
या खुनाचा तपास करुन सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांनी न्यायालयात दोषारोप दाखल केले होते. या प्रकरणी सरकारी पक्षाने बारा साक्षीदारांची साक्ष नोंदवली. गुन्ह्यातील पुराव्याआधारे जिल्हा व सत्र न्यायाधीस सी. एम. बागल यांनी पती लक्ष्मण चांडाळ यास दोषी धरून जन्मठेप व एक हजार रुपये दंड तसेच अन्य एका कलमान्वये पाच वर्षे कैद व पाचशे रुपये दंड, सहा महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. डी. यु. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅड. बी. बी. घटे यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली. कोर्ट पैरवी म्हणून फौजदार शिवशंकर मनाळे, कर्मचारी प्रवीण राठोड यांनी काम पाहिले.

संपादन - अभय कुळकजाईकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband sentenced to life imprisonment for murdering wife, Parbhani news