गर्भवती पत्नीला मारून पतीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

घरात गर्भवती पत्नीचा मृतदेह, गळफास घेऊन तिच्या पतीने केलेल्या आत्महत्येची घटना रविवारी (ता. सात) पहाटे उघडकीस आल्यानंतर कृष्णूर (ता. नायगाव) येथे खळबळ उडाली. पत्नीचा खून करून पतीने आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

बरबडा - घरात गर्भवती पत्नीचा मृतदेह, गळफास घेऊन तिच्या पतीने केलेल्या आत्महत्येची घटना रविवारी (ता. सात) पहाटे उघडकीस आल्यानंतर कृष्णूर (ता. नायगाव) येथे खळबळ उडाली. पत्नीचा खून करून पतीने आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

शुभांगी (वय २२) हिचा गंगाधर गवाले (२५, रा. औराळा, ता. कंधार) याच्याशी वर्षापूर्वी विवाह झाला. गर्भवती शुभांगी माहेरी कृष्णपूरला आली होती. तर गंगाधर हा दोन-तीन दिवसांपूर्वी सासरी कृष्णपूरला आला होता. आपली नात शुभांगी का उठली नाही, हे पाहण्यासाठी तिच्या आजीने आज पहाटे घरात पाहणी केली. त्या वेळी शुभांगी झोपेत असल्याचे दिसले. आवाज देऊनही ती प्रतिसाद देत नसल्याने आजीने आरडाओरड केली. परिसरातील लोकांनी पाहिले असता, शुभांगी मृत झाल्याचे आढळले. त्यानंतर पती गंगाधरचा शोध सुरू झाला. घरातील मधल्या खोलीत तो गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. ग्रामस्थांनी माहिती देताच कुंटूरचे सहायक पोलिस निरीक्षक शरद मरे, जमादार कुमरे आदींनी प्राथमिक चौकशी करून दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले. शनिवारी (ता. सहा) रात्री दोघांत वाद झाला असावा, त्यातून शुभांगीचा गळा दाबून खून केल्यानंतर गंगाधरने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. कुंटूरचे पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: Husband suicide by killing pregnant wife in aurangabad