ती म्हणते त्याने दुसरे लग्न केलेय, तो म्हणतो घर नावावर करण्यासाठी ती भांडते

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

  • पती-पत्नीची एकमेकांविरोधात तक्रार 
  • पतीसह दोन मुलं अटक 
  • औरंगाबादेतील सिटी चौक पोलिसात गुन्हा 

औरंगाबाद : पतीने विषारी औषध पाजलंय, स्वतःही पिलाय; तसेच त्याने दुसरा विवाह केलाय, अन्‌ उदरनिर्वाहाला पैसेही देत नसल्याची तक्रार घेऊन "ती' पोलिस ठाण्यात आली. त्यावर पतीवर गुन्हा दाखल होतो न होतो तोच "तो'ही पोलिस ठाण्यात गेला अन्‌ पत्नीचा मालमत्तेवर डोळा आहे, तिच्या नावावर करून देण्यासाठी माझ्याशी भांडते, अशी तक्रार घेऊन ठाण्यात गेला. प्रकरणात एकमेकांविरोधातील तक्रारीवरून सिटी चौक पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, पतीसह दोन मुलांना अटक करण्यात आली आहे.

 
तसलीम ही तय्यबशी सतत भांडत होती. 27 सप्टेंबर रोजी तय्यब दुकानात असताना, तसलीम हिच्यासह सलमान कुरेशी, अनस कुरेशी, समीर कुरेशी ही मुले दुकानात आली व त्यांनी घर तसलीमच्या नावावर करून देण्यासाठी मारहाण करून बळजबरीने विष पाजले, अशी तक्रार तय्यबने केल्यावरून गुन्हा दाखल झाला. सलमान कुरेशी व अनस कुरेशी यांना मंगळवारी (ता.एक) अटक करण्यात आली. 

तसलीम बेगम तय्यब कुरेशी (40, रा. लोटाकारंजा) हिच्या तक्रारीनुसार, 27 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी ती घरी असताना पती तय्यब कुरेशी जैनुल आबेदीन कुरेशी याने घरी येत तसलीमला बळजबरी विषारी औषध पाजले आणि अर्धे औषध स्वत: पिले; तसेच पतीने तय्यबने दुसरा विवाह केला असून, उदरनिर्वाहासाठी तो पैसे देत नाही, असेही तिने तक्रारीत म्हटले आहे. प्रकरणात तय्यब कुरेशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्याला मंगळवारी अटक करण्यात आली.  तय्यब कुरेशीच्या तक्रारीनुसार, वर्ष 1996 मध्ये त्यांचे लग्न तसलीमसोबत झाले होते. तेव्हापासून तसलीमचे सगळे लक्ष तय्यबच्या मालमत्तेवर असून, घर तिच्या नावावर करून देण्यासाठी ती तय्यबशी सतत भांडत होती. 

पतीसह दोन मुलांना कोठडी 

प्रकरणात तय्यब कुरेशी, सलमान कुरेशी व अनस कुरेशी यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, शनिवारपर्यंत (ता.पाच) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एन. माने यांनी दिले. आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी न्यायालयात केली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband - wife quarrel : FIR registered in police Thane