‘मी समाजाचा शत्रू !’

प्रताप देशमुख
बुधवार, 25 मार्च 2020


पोलिस प्रशासनाच्या धडक कारवाईची ग्रामस्थांनी मात्र धास्ती घेतली असून संचारबंदी उल्लंघन करणाऱ्यांवर ‘मी समाजाचा शत्रू आहे’ असा बोर्ड घेऊन फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले जात असल्यामुळे पोलिसांनी अनोखा उपक्रम राबवून जनतेवर अंकुश ठेवला आहे.

बारड, (ता. मुदखेड जि. नांदेड) ः येथील ग्रामस्थांनी ‘कोरोना’ मुक्तीसाठी सामुहिक लढा उभारला असून कोणीच घराबाहेर न पडण्याचा निर्धार केला आहे. तसेच संसर्गजन्य आजारातून सर्वांची सुटका होण्याकरीता गुढी उभारून सुखी आरोग्यासाठी प्रार्थना केली असून ग्रामस्थांना अत्यावश्यक सेवा घरपोच पोहोचविण्यासाठी सामाजिक सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेतला आहे.

 

बाजारपेठ कडकडीत बंद
जगात ‘कोरोना’ सारख्या भयानक महामारी आजाराने थैमान घातले आहे. यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने सर्वतोपरी उपाययोजना आखल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदीचा हायअलर्ट जारी केला असून यास प्रतिसाद देण्यासाठी ग्रामस्थ सरसावले आहेत. गावातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवली आहेत. यासोबतच बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. ग्रामपंचायतीने संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी गावात किटकनाशक औषधांची फवारणी केली आहे. पोलिस प्रशासनाने गावात १४४ जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. यासोबतच सर्व व्यापाऱ्यांना पान टपरी, हॉटेल्स बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 

नातेवाईकांवर १४ दिवसाची नजरकैद
शहरातून गावाकडे परतणाऱ्या नातेवाईकांना हजर होण्याचे फर्मान आरोग्य विभागाने काढले आहेत. या रुग्णांच्या सर्वेक्षणासाठी अंगणवाडी कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली असून घराघरात जाऊन बाहेरगावाहून येणाऱ्या नातेवाईकांची चौकशी आणि नोंदणी केली जात आहे. शहरातून गावाकडे परतणाऱ्या नातेवाईकांवर १४ दिवसाची नजरकैद ठेवली जात आहे. केंद्र सरकारच्या आदेशान्वये येत्या १४ एप्रिलपर्यंत देश लॉकडाऊन केला असून ग्रामस्थांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा निर्धार केला आहे. 

 

हेही वाचा -  लॉकडाऊन’मध्ये राबणारांच्या आरोग्यासाठी मानवतेचे दर्शन- काय आहे ते वाचा
‘कोरोना’ सुरक्षतेसाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खंडागळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. आरोग्य प्रशासनाने ग्रामीण रुग्णालयात कोरोना संशयित रुग्णांच्या तपासणीसाठी स्वतंत्र कक्षाची उभारणी केली आहे. यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किशोर कदम, वैद्यकीय अधिकारी अतुल कदम, परिचारिका प्रमुख अतुल कांबळे यांची नियुक्ती केली आहे. पोलिस प्रशासनाच्या धडक कारवाईची ग्रामस्थांनी मात्र धास्ती घेतली असून संचारबंदी उल्लंघन करणाऱ्यांवर ‘मी समाजाचा शत्रू आहे’ असा बोर्ड घेऊन फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले जात असल्यामुळे पोलिसांनी अनोखा उपक्रम राबवून जनतेवर अंकुश ठेवला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'I am the enemy of society!'