'आरक्षण न मिळाल्यास आकाश-पाताळ एक करू"

सुशांत सांगवे
शनिवार, 29 डिसेंबर 2018

- माजी मंत्री अण्णा डांगे यांचा इशारा
- धनगर समाजाचे आमदार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

लातूर: ‘धनगर समाजाला आरक्षण देणार आहे. थोडं थांबा’, असे मुख्यमंत्री वारंवार सांगत आहेत. पण थोड थांबा म्हणजे किती काळ थांबा? साडेचार वर्षे आम्ही थांबलो. पण मुख्यमंत्र्यांनी अद्याप धनगर समाजाला आरक्षण दिले नाही. त्यांनी आमचा विश्वासघात केला तर जनता येणाऱ्या निवडणूकीत जनता सरकारचा विश्वासघात केल्याशिवाय राहणार नाही, असे माजी मंत्री अण्णा डांगे यांनी शनिवारी येथे सांगितले. आरक्षण न मिळाल्यास मराठा समाजाप्रमाणे आम्हीही आकाश-पाताळ एक करू, असा इशाराही त्यांनी दिला.

धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाज महासंघाची बैठक लातूरात शनिवारी घेण्यात आली. बैठकीला आमदार रामहरी रूपनर, नाना कस्पटे, बबनराव रानगे, नागनाथ गाडेकर, संभाजी बैकरे, संतोष धनगर, प्रा. संतोष सलगरे, उमेश घोरूडे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डांगे यांनी आपली भूमिका मांडली. आरक्षणासाठी धनगर समाजाचे सर्व आमदार आठवडाभरात मुख्यमंत्र्यांचे भेट घेणार आहेत. या भेटीनंतर आंदोलनाची नेमकी रूपरेषा ठरवली जाणार आहे, असे डांगे यांनी सांगितले.

डांगे म्हणाले, ‘‘आमचे सरकार आले तर धनगर समाजाला पहिल्याच बैठकीत आरक्षण देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत सांगितले होते. त्याप्रमाणे धनगर समाजाने त्यांना मते दिली. पण मुख्यमंत्र्यांनी अद्याप आपले आश्वासन पूर्ण केले नाही. साडेवर्षे झाली. धनगर समाजाला जाणून बूजून मागे ठेवले जात आहे. जे घटनेत आहे त्याला आरक्षण दिले जात नाही; पण जे घटनेत नाही, त्याला ताकदी जोर दाखवल्यामुळे आरक्षण दिले जात आहे. राजा इतका उदार झाला आहे. त्याने आता आमच्या समस्याही सोडवायला हव्यात. अन्यथा आम्हीही मंत्र्यांना, आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही. धनगर समाज साधा-भोळा आहे. त्याने सरकारवर विश्वास ठेवला आहे. तो खोटा ठरवू नका.

Web Title: If we do not get reservation, we will take Strict Action says Ex Minister Dange