अनधिकृत बॅनर, पोस्टरचा विळखा सुटू लागला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

औरंगाबाद - महापालिका व पोलिस प्रशासनाच्या नऊ पथकांनी रविवारी (ता. २९) शहराच्या रस्त्यांना विळखा घातलेले एक हजार ९८१ अनधिकृत पोस्टर, बॅनर हटविले. जागा सोडून रस्त्यावर ठोकलेले दुकानांचे फलक, कमानी जेसीबीद्वारे तोडून जप्त करण्याची या वेळी कारवाई करण्यात आली. 

औरंगाबाद - महापालिका व पोलिस प्रशासनाच्या नऊ पथकांनी रविवारी (ता. २९) शहराच्या रस्त्यांना विळखा घातलेले एक हजार ९८१ अनधिकृत पोस्टर, बॅनर हटविले. जागा सोडून रस्त्यावर ठोकलेले दुकानांचे फलक, कमानी जेसीबीद्वारे तोडून जप्त करण्याची या वेळी कारवाई करण्यात आली. 

‘अनधिकृत होर्डिंग्जचा विळखा’ अशी ‘सकाळ’ने मालिका प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेऊन महापालिका व पोलिस प्रशासनाने शनिवारपासून वॉर्डनिहाय संयुक्‍त कारवाई सुरू केली आहे. पहिल्या दिवसानंतर कारवाईची तडफ दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. रविवार सुटीचा दिवस असतानाही सर्व झोनमध्ये कारवाई करण्यात आली. झोन एक ते पाचअंतर्गत असलेल्या गांधी पुतळा, शहागंज, शहाबाजार, सिटी चौक, लोटाकारंजा, बुढीलेन, नंदनवन कॉलनी, औरंगपुरा, गुलमंडी, मोतीकारंजा, दिवाण देवडी, क्रांती चौक, हडको, टीव्ही सेंटर ते जळगाव रोड, एन ९, एम २, आंबेडकर चौक, व्ही.आय.पी. रोड, बळिराम पाटील चौक, चिश्‍तिया चौक ते एन ६ स्मशानभूमी या भागांत, तर झोन सहा ते नऊअंतर्गत जयभवानीनगर ते पुंडलिकनगर, महालक्ष्मी चौक ते कामगार चौक, दर्गा चौक ते एमआयटी कॉलेज, देवळाई चौक ते सूर्या लॉन्स, एमजीएम ते चिश्‍तिया चौक, जीएसटी कार्यालय ते जालना रोड, टाऊन सेंटर ते एसबीआय क्षेत्रीय कार्यालय, कॅनॉट प्लेस ते सिडको बसस्थानक, क्रांती चौक ते बाबा पेट्रोलपंप ते रेल्वेस्टेशन ते क्रांती चौक या रस्त्यांवर मोहीम राबविण्यात आली.  

वॉर्ड अधिकारी भालचंद्र पैठणे, अस्लम कादरी, मुकुंद कुलकर्णी, अजमतखान, सविता खरपे, मीरा चव्हाण, मनोहर सुरे, महावीर पाटणी, एस. आर. जरारे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

जप्त केलेले फलक 
  प्रभाग एक     : १६७ 
  प्रभाग दोन     : २१२ 
  प्रभाग तीन     : २०६ 
  प्रभाग चार     : १४२ 
  प्रभाग पाच     : २३९ 
  प्रभाग सहा     : १६२ 
  प्रभाग सात     : १४८ 
  प्रभाग आठ     : ३१९ 
  प्रभाग नऊ     : ३८६

Web Title: illegal banner poster crime by municipal