लातुरात 11 लाख रुपये बदलून देण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

लातूर - अकरा लाख रुपयांच्या नोटाच्या देवाण-घेवाणीचा व्यवहार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंध्र बॅंकेच्या येथील शाखेचा सहायक व्यवस्थापक, रोखपालासह एका आडत व्यापाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन हजारच्या नव्या नोटांचा समावेश असलेले 11 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. या तिघांनाही न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

आंध्र बॅंकेच्या येथील शाखेचे दोन कर्मचारी शनिवारी रात्री अंबाजोगाई रस्त्यावरील एसटी वर्कशॉपसमोर असलेल्या अर्बन बॅंकेजवळ दोन हजारच्या नव्या नोटा घेऊन येणार आहेत, वीस टक्के कमिशनवर बंद झालेल्या पाचशे, हजारच्या नोटा स्वीकारून त्या बदल्यात नव्या नोटा देण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा लावला. त्या वेळी ठरलेल्या जागी तीन व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता, दोन हजारच्या नव्या नोटांचा समावेश असलेले 11 लाख रुपये आढळले. या वेळी पोलिसांनी आंध्र बॅंकेच्या येथील शाखेचा सहायक व्यवस्थापक हिमांशू राजबहादूरसिंग, रोखपाल शिशुपाल राजपालसिंह आर्या, आडत व्यापारी मनोज भानुदास घार यांना अटक केले. अकरा लाखांच्या नोटाही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

नोटाबंदीनंतर त्या परस्पर बदलून देण्याचे लातूर जिल्ह्यातील हे तिसरे प्रकरण आहे. या पूर्वी महाराष्ट्र बॅंकेच्या उदगीर शाखेत 18 लाख बदलून देण्याचा प्रकार गाजत असताना उदगीरच्या एसटी आगारातील रोखपालाने 1 लाख 47 हजारांच्या नोटा बदलून दिल्याचे उघडकीस आले आहे.

Web Title: Illegal exchange of Currency