बेकायदा नळांना एक हजारात ‘अभय’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - वारंवार अभय योजना राबवूनही प्रतिसाद मिळत नसल्याने आता केवळ एक हजार रुपयांमध्ये शहरातील बेकायदा नळ कनेक्‍शन नियमित करण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ही मोहीम १५ ऑगस्टपासून सुरू केली जाणार आहे. 

शहरात असलेले सुमारे दीड लाख बेकायदा नळ कनेक्‍शन नियमित करण्यासाठी महापालिकेमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आतापर्यंत जाहीर झालेल्या अभय योजनेला नागरिकांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. अभय योजनेत केवळ ८०० नळ नियमित करून घेण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसत आहे. बेकायदा नळ रेकॉर्डवर आणल्यास त्यापोटी मोठे उत्पन्न मिळेल, म्हणून कमीत कमी दंड आकारून बेकायदा नळ कनेक्‍शन नियमित करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. 

या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्तांना पत्र देण्यात आले होते. त्यानुसार आयुक्तांनी शासनाच्या निर्णयाचा हवाला देत एक हजार रुपये दंड आकारता येईल, असे सूचित केले आहे. त्यामुळे एक हजार रुपये दंड आकारून बेकायदा नळ कनेक्‍शन नियमित करण्याची मोहीम १५ ऑगस्टपासून सुरू केली जाणार आहे, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

Web Title: illegal water connection municipal