चक्क बैलगाडीमधून दुचाकीवरचा प्रवास 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याच्‍या सीमेवर दुसऱ्या जिल्ह्या‍त प्रवेश दिला जात नाही म्‍हणून काहींनी बैलगाडीत दुचाकी ठेवून परतूर तालुक्यातील गोदावरी नदीपात्र ओलांडायचा फंडा सुरू केला आहे. 

आष्टी  (जि.जालना) - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउननंतर प्रत्येक जिल्ह्याच्या हद्दी बंद करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्याच्‍या सीमेवर दुसऱ्या जिल्ह्या‍त प्रवेश दिला जात नाही म्‍हणून काहींनी बैलगाडीत दुचाकी ठेवून परतूर तालुक्यातील गोदावरी नदीपात्र ओलांडायचा फंडाही सुरू केला आहे. 

जिल्ह्यांच्या हद्दी व चेकपोस्टवर पोलिसांची गस्त आहे. शिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे. लॉकडाउननंतर जालना व बीड या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर गंगासावंगी येथील चेकपोस्टवर कडक बंदोबस्त आहे. येथे पोलिस येऊ देत नाहीत म्हणून काही लोकांनी ढालेगाव, चांगतपुरी, हद्दीतील गोदावरी नदीच्या पात्रातून चोरटी अवैध वाळू वाहतुकीप्रमाणे छुप्या मार्गाने गुपचूप येणे-जाणे सुरू असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

परिसरातील गोदाकाठच्या चांगतपुरी, गोळेगाव येथून शेजारील बाहेरगावाकडे जाण्या-येण्यासाठी गोदावरीच्या पात्रात भरपूर पाणी असल्याने कलई, चप्पूच्या साह्याने प्रवास सुरू होता. कोरोनामुळे लॉकडाउननंतर कलई व चप्पूद्वारे वाहतूक बंद झाल्याने संपर्क तुटला.

हेही वाचा : नवऱ्याला भांडून गेली, कोरोनाला सापडली

परिणामी बीड जिल्ह्याच्‍या हद्दीत शेतीकामे किंवा अन्य कामांसाठी दूरवरून माजलगाव रस्ता किंवा कुंभार पिंपळगाव रस्‍त्‍याने जावे लागते; मात्र या मुख्य रस्त्यावर चेकपोस्ट तैनात असल्याने कोंडी करण्यात आली आहे. यामध्ये पर्यायाने गोदावरी पात्रातून बैलगाडीने मार्ग होत असल्याचे दिसून येत आहे. 

जिल्हाबंदी मनाई आदेश तोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल

पारध (ता.भोकरदन) :  अक्षय तृतीया सणासाठी आपल्या गावाकडे आलेल्या सात जणांवर रविवारी (ता. २६) पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की संचारबंदी, जिल्हाबंदी मनाई आदेश असताना रेड झोन असलेल्या शहरी भागातून दिलीप काटोले, योगिराज सरोदे, समाधान श्रीसागर तसेच अन्य महिला आदी सात जण अवैधरीत्या पारध येथे अक्षय तृतीया सणासाठी आले, याबाबत त्यांनी कोणाला माहितीही दिली नाही. शासनाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी गजानन उंबरकर यांच्या तक्रारीवरून सात जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

तीन दुकानदारांवर गुन्हा दाखल 

पारध : सध्या देशभरात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू आहे. असे असताना लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्या अन्वा (ता. भोकरदन) येथील तीन दुकानदारांवर पारध पोलिसांनी रविवारी (ता. २६) गुन्हे दाखल केले आहे. पारध पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शंकर शिंदे, सुरेश पडोळ, समाधान वाघ, सुरेश डुकरे, जीवन भालके आदी अन्वा येथे गस्त घालत लॉकडाउनचे उल्लंघन करीत असल्याचे आढळले. यात जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाची पायमल्ली करणाऱ्या पूनम ट्रेडर्स अँड इलेक्ट्रिकलचे पुंजाजी सोनुने, टायर दुकानदार महमद खान कादर खान, पूजा इलेक्ट्रिकल बळीराम हुडेकर यांच्यावर गुन्हे दाखल केले. असून पुढील तपास जमादार प्रकाश सिनकर करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegally entry in district