नवऱ्याला भांडून गेली, कोरोनाला सापडली 

महेश गायकवाड
Friday, 17 April 2020

पतीसोबत वाद झाल्यामुळे एक महिला गुजरातला परतली होती. तिथे तपासणी करण्यात आली असता ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचे शुक्रवारी (ता. १७) समोर आले. त्यामुळे जालना जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाची रात्री एकच धावपळ उडाली.

जालना -   तालुक्यातील गुंडेवाडी गावाजवळ असलेल्या एका वस्तीत कामानिमित्त आलेली एक महिला पतीसोबत वाद झाल्यामुळे गुजरातला परतली होती. तिथे तपासणी करण्यात आली असता ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचे शुक्रवारी (ता. १७) समोर आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाची रात्री एकच धावपळ उडाली. 

याबाबत गुंडेवाडी गावच्या ग्रामसेविका दुर्गा भालके यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला गुजरात राज्यातील असून गुंडेवाडी परिसरात असलेल्या पशुखाद्य निर्मिती करणाऱ्या कंपनीत कार्यरत होती. पतीसोबत वाद झाल्याने ती ता. १० एप्रिलला गुजरातमध्ये निघून गेली होती.

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

या महिलेला नर्मदा जिल्ह्यात अडवून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे स्वॅब नमुने तपासले असता शुक्रवारी (ता. १७) या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. नर्मदा जिल्ह्यातील प्रशासनाने या महिलेच्या प्रवासाचा इतिहास जाणून घेतला व तातडीने याबाबतची माहिती जालना जिल्हा प्रशासनास कळविली.

हेही वाचा : पोलिसांच्या सुदृढ आरोग्यासाठी अष्टसूत्री

माहिती मिळाल्यानंतर ग्रामसेवक दुर्गा भालके व आरोग्य विभागाचे पथक रात्री सदर महिला राहत असलेल्या ठिकाणी पोचले व कोरोनाबाधित महिलेच्या पतीसह तिच्या संपर्कात आलेल्या शेजारच्या १४ जणांना तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. 

कोरोनाबाधित आढळून आलेली महिला मूळची गुजरात राज्यातील असून गुंडेवाडी परिसरातील एका कंपनीत कार्यरत होती. तिची तपासणी नर्मदा जिल्ह्यात झाली असून तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून माहिती मिळाल्यानंतर तिच्या पतीसह संपर्कात आलेल्या १४ जणांना तपासणीसाठी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. 
- दुर्गा भालके, ग्रामसेविका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman Corona report positive