लोकभावनेबरोबरच आरोग्यालाही महत्त्व - धनंजय मुंडे 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

कोरोनाच्या प्रादुर्भावापासून जिल्ह्याला वाचविण्यासाठी निर्णय घेतले जात असून लोकभावनेबरोबरच जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याला महत्त्व दिले जात असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. 

बीड - जिल्ह्याचा समावेश ‘ऑरेंज झोन’मध्ये झाला असला, तरीही जिल्हा शंभर टक्के ‘ग्रीन झोन’मध्ये जाईल. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून जिल्ह्याला वाचविण्यासाठी निर्णय घेतले जात असून लोकभावनेबरोबरच जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याला महत्त्व दिले जात असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. चार) आढावा बैठक झाली. आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम उपस्थित होते. 
श्री. मुंडे म्हणाले, की बदलत्या परिस्थितीत विचारपूर्वक पावले टाकली जात आहेत. लोकांच्या अडचणी कमी व्हाव्यात व संसर्ग येऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

जिल्ह्यासाठी नऊ हजार पीपीई किट उपलब्ध झाल्या असून वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी या किट देण्याच्या सूचना देण्यात आल्या. पोलिस यंत्रणेवरील वाढणारा ताण लक्षात घेता साडेपाचशे होमगार्ड जवानांची सेवा जिल्ह्यातील पोलिस विभागात मिळाव्यात, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्यात आला आहे. कापूस खरेदीसाठी जिल्ह्यातील तेरा जिनिंग केंद्रांमध्ये सहा ग्रेडर उपलब्ध असल्याने उद्यापर्यंत आणखी चार ग्रेडर उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. विवाहासाठी २० नातेवाइकांना उपस्थित राहण्यासाठी नियमात शिथिलता देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आल्याचेही पालकमंत्री श्री. मुंडे सांगितले. 

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

शेतकऱ्यांसाठी बांधावर डिझेलचा उपक्रम 
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बांधावर डिझेल हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. सुरवातीस सुसज्ज वाहनातून डिझेल वितरणाची मीटर, किंमत दर्शविणारी यंत्रणा असून इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या सहकार्याने हे वाहन जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या डिझेल इंधनाचा प्रश्न सुटणार आहे, 
असे धनंजय मुंडे म्हणाले. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Importance of health along with public sentiment - Dhananjay Munde