औरंगाबाद शिक्षण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, कोणता?  

कैलास चव्हाण
Friday, 22 May 2020

बोर्डाचे वाहन संबधीत जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवुन औरंगाबादला दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका जमा होणार असल्याची माहीती शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दिली.

परभणी : लॉकडाउनमुळे दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका जमा करण्यावर परिणाम झाल्याने औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने जिल्हानिहाय उत्तररपत्रिका संकलीत करण्यास सुरुवात केली आहे. त्याचे वेळापत्रकही शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. 

दरवर्षीप्रमाणे ठरलेल्या वेळापत्रकानुसार बारावी बोर्डाच्या परीक्षा संपन्न झाल्या. परंतु दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना देशावर कोरोना विषाणुचे संकट आले. त्यामुळे २२ मार्चपासून लॉकडाउनची घोषणा झाली. परिणामी ता.२३ मार्च रोजी होणारा भुगोलचा पेपर रद्द करण्यात आला. त्याचे सरासरी गुण द्यावयाचा सुद्धा निर्णय झाला. देशभरात सर्वत्र संचारबंदी असल्याने  अनेक विषयांच्या उत्तर पत्रिका शाळेतच पडून होत्या. शाळा बंद असल्यामुळे शिक्षकांना शाळेत येऊन उत्तरपत्रिका तपासणे अडचणीचे होते. 

यासाठी राज्य मंडळाचे सदस्य आमदार  विक्रम काळे यांनी राज्य मंडळ अध्यक्ष व शिक्षण सचिवांसोबत चर्चा करून उत्तर पत्रिका संबंधित शिक्षकांना तपासणीसाठी घरी नेण्याची व तपासून परत त्यांच्या नियामकांकडे देण्यासाठी संचारबंदी काळात पासची सुविधा उपलब्ध करून दिली. आता उत्तरपत्रिका तपासून झालेल्या आहेत.

हेही वाचा - Parbhani Breaking; गुरुवारी चार पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ, संख्या २० वर

औरंगाबाद कोरोना हॉटस्पॉट झाल्यामुळे व शहर रेड झोनमध्ये असल्यामुळे बाहेरील जिल्ह्यातून उत्तर पत्रिका औरंगाबाद बोर्डात घेऊन येण्यासाठी इतर जिल्ह्यातील नियामक शिक्षक घाबरत आहेत. त्यामुळे औरंगाबाद बोर्डाने जालना, परभणी, हिंगोली, बीड या जिल्ह्यात बोर्डाचे वाहन व अधिकारी पाठवून उत्तर पत्रिका जिल्ह्याच्या ठिकाणी जमा करून बोर्डात आणाव्यात अशी सूचना महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेसह आमदार श्री. काळे यांनी राज्य मंडळांच्या अध्यक्षांकडे केली होती. 

असे असेल  संकलन नियोजन

जिल्हा संकलनाची तारीख स्थळ
औरंगाबाद २२, २३ ,२४ मे औरंगाबाद बोर्ड
जालना २६ मे राष्ट्रीय हिंदी विद्यालय 
हिंगोली २७  में माणिक मेमोरियल  विद्यालय 
परभणी २९ व ३१ मे जिल्हा परिषद कन्या प्रशाला
बीड दोन व तीन जून भूमरे पाटील हायस्कूल 

त्यानंतर राज्य मंडळाने तसे नियोजनही करण्याचे आदेश औरंगाबाद बोर्डाला दिले होते. परंतु बोर्डाने औरंगाबाद बोर्डातच उत्तरपत्रिका आणून जमा कराव्यात असे आदेश काढले. यानंतर आमदार  काळे यांनी ( ता. २० मे ) पुणे येथील राज्य मंडळ अध्यक्षांशी परत या विषयावर चर्चा केली आणि कोणत्याही परिस्थितीत आमचे नियामक शिक्षक उत्तर पत्रिका घेऊन औरंगाबादला येणार नाहीत.

हे देखील वाचाच - धक्कादायक : कोरोनामुळे कामधंदा मिळेना म्हणून मजुराची आत्महत्या

औरंगाबाद बोर्डाने प्रत्येक जिल्ह्यात जाऊन उत्तरपत्रिका जमा कराव्यात असे सुचविलेले होते. त्यानंतर सूचनेनुसार  राज्य मंडळाने  औरंगाबाद बोर्डाला ( ता. २१ मे) में रोजी आदेश निर्गमित करुन प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जिल्ह्यातील उत्तरपत्रिका त्या-त्या तारखेनुसार जमा करावेत असे सांगितले. 

नियोजित स्थळी उत्तरपत्रिका जमा कराव्यात
उत्तरपत्रिकांच्या चिंतेत असलेल्या सर्व दहावी-बारावीच्या नियामक शिक्षकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील सर्व नियामक शिक्षकांनी उत्तर पत्रिका नियोजित स्थळी जमा कराव्यात. त्या ठिकाणावरून औरंगाबाद बोर्डाचे अधिकारी कर्मचारी उत्तरपत्रिका संकलन करतील.  - विक्रम काळे (शिक्षक आमदार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important Decision Of Aurangabad Board Of Education Parbhani News