Parbhani Breaking; गुरुवारी चार पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ, संख्या २० वर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

परभणी जिल्हावासीयांची धाकधूक पुन्हा वाढली असून गुरुवारी (ता.२१) रात्री साडेनऊ वाजता चार रुग्णांची भर पडली आहे. यामुळे एकूण रुग्ण संख्या २० वर गेली आहे. दरम्यान, काही दिवसांपासून परभणी जिल्ह्यात परजिल्ह्यांतील शेकडोच्या संख्येने आलेल्या नागरिकांमुळेच हा प्रकार घडतोय. मुंबई व पुणे येथून परत आलेल्या नागरिकच कोरोनाचे शिकार ठरले असून परजिल्ह्यांतून आलेल्या नागरिकांच्या तपासणीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

परभणी : परभणी जिल्ह्यात मोठ्या शहरातून परतलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याचे समोर आले आहे. बुधवारी (ता.२०) या एकाच दिवशी जिल्ह्यात नऊ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत, त्यातच जिल्ह्यात गुरुवारी (ता.२१) रात्री साडेनऊ वाजता चार पॉझिटिव्ह रुग्ण वाढल्याने आता जिल्ह्याची संख्या २० झाली आहे. 

परभणी जिल्ह्यात सुरुवातीपासून एकही रुग्ण नव्हता. परंतू हळूहळू परभणी जिल्ह्यात ही कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. सोनपेठ तालुक्यातील शेळगाव (महाविष्णु) या गावातील महिला कोरोनाबाधीत आढळून आली आहे. ही महिला मुंबईहून परतली होती. त्या महिलेच्या संपर्कात आलेले अन्य सहा जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्या सर्वांचे स्वॅब अहवाल बुधवारी (ता.२०) जिल्हा शासकीय रुग्णालयास सायंकाळी प्राप्त झाले. त्यात त्या महिलेच्या संपर्कात आलेले सहाजण देखील कोरोना विषाणुने बाधित झाले आहेत. तसेच गंगाखेड तालुक्यातील दोन व माटेगाव (ता.पूर्णा) येथील एक असे अन्य तीन रुग्णांचे अहवाल देखील पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे एकाच दिवशी परभणी जिल्ह्यात नऊ नवे रुग्ण आढळून आले आहेत. 

हेही वाचा - धक्कादायक - नांदेडला एकाचा मृत्यू तर सहा पॉझिटिव्ह -

१९ रुग्णांवर उपचार सुरु
पुन्हा गुरुवारी चार रुग्ण वाढल्याने आता जिल्ह्यातील रुग्णांची संख्या २० वर गेली आहे. या पैकी केवळ एक रुग्ण बरा होऊन घरी गेला आहे. उर्वरित सर्व १९ रुग्णांवर परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हेही वाचा - धक्कादायक : कोरोनामुळे कामधंदा मिळेना म्हणून मजुराची आत्महत्या

चेकपोस्टवरील तपासणीवर संशयाची सुई
परभणी जिल्ह्याच्या चारही बाजूंना सीमा बंदीसाठी पोलिसांचे चेकपोस्ट लावण्यात आले आहे. या चेकपोस्ट ओलांडून लोक जिल्ह्यात येतातच कसे, हे न उलगडणारे कोडे आहे. जर लोक आडमार्गांनी जिल्ह्यात घुसले असतील तर त्यावर गावकरी व कोरोना ग्रामसुरक्षा समिती काय काम करत आहे, हा मोठा प्रश्न आहे.
.........
परभणी जिल्ह्याची स्थिती
...
एकूण रुग्ण - २०
उपचार सुरु -१९
घरी सोडले - एक
मृत्यू - शून्य
---- 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani Breaking; On Thursday, The Number Of Four Positive Patients Increased To 20