esakal | धक्कादायक : कोरोनामुळे कामधंदा मिळेना म्हणून मजुराची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli photo

 प्रशासनाने लॉकडाउन, संचारबंदी लागू केली आहे. लॉकडाउनच्या काळात अनेकांचे रोजगार बुडाले असून कामधंदा मिळत नसल्याचे चित्र आहे. यातूनच हाताला काम मिळत नसल्याने एका ५० वर्षीय मजूराने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

धक्कादायक : कोरोनामुळे कामधंदा मिळेना म्हणून मजुराची आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : कोरोनामुळे कामधंदा मिळत नसल्याच्या नैराशातून चोंढी बहिरोबा येथील एका ५० वर्षीय मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आंबाळा (ता. वसमत) शिवारात घडली. या बाबत कुरुंदा पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. २०) रात्री उशिरा आकस्‍मिक मृत्‍यूची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. आतापर्यंत जिल्हाभरात कोरोनाबाधितांचा आकडा शंभरवर पोचला आहे. त्यामुळे प्रशासनाने लॉकडाउन, संचारबंदी लागू केली आहे.
लॉकडाउनच्या काळात अनेकांचे रोजगार बुडाले असून कामधंदा मिळत नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचाकळमनुरीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्‍महत्या

 कामे बंद पडल्याने कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न निर्माण होत आहे. यातूनच चोंढी बहिरोबा येथील एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहेबराव मुंजाजी भोकरे (वय ५०, रा. चोंढी बहिरोबा, ता. वसमत) या मजुराने मंगळवारी (ता. १९) दुपारच्या वेळी आंबाळा शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्‍महत्या केली.

परिसरात घेतला शोध

 कोरोनामुळे हाताला काम मिळत नसल्याने ते काही दिवसांपासून चिंतेत होते. यातूनच ते सोमवारी (ता. १८) घरातून निघून गेले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा परिसरात शोध घेतला. यावेळी मंगळवारी (ता. १९) आंबाळा शिवारात लिंबाच्या झाडाला त्यांचा मृतदेह आढळून आला. 

पोलिसांची घटनास्थळी भेट

घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, जमादार गजाजन भोपे यांच्या पथकाने भेट घटनास्थळी भेट दिली. या बाबत विजय साहेबराव भोकरे यांच्या खबरीवरून कुरुंदा पोलिस ठाण्यात बुधवारी आकस्‍मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.


कोरोनाबाधितांचा आकडा पोचला शंभरावर

हिंगोली जिल्ह्यात एकूण शंभर व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील ८५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात १५ कोरोनाबाधित रुग्ण असून तज्‍ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत.
बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार एका २३ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे स्‍पष्ट झाले आहे.

येथे क्लिक कराचोरट्यांनी अख्या गावाला टाकले संकटात

मुंबई येथून आलेल्यांनी चिंता वाढविली

एसआरपीएफच्या सहा जवानांवर औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. तर आठ रुग्णांवर वसमत येथे व एकावर हिंगोलीत उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना मुंबई येथून आलेल्या नागरिकांनी चिंता वाढविली आहे. आरोग्य विभाग आयसोलेशन वार्ड व तालुक्‍याच्या ठिकाणी असलेल्या क्‍वारंटाइन सेंटरमध्ये सतत लक्ष ठेवून आहे. वेळोवेळी रुग्णांची तपासणी व औषधोपाचार केले जात असल्याने रुग्णांची संख्या कमी करण्यात यश आले आहे.