"बालनाट्य चळवळ शैक्षणिक चळवळ व्हावी' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

नांदेड - बालनाट्य प्रशिक्षण, मुलांच्या स्वयंप्रेरित व्यक्तिमत्त्वासाठी आणि नाटकाच्या सादरीकरणाच्या पूर्वतयारीसाठी गरजेचे आहे. मात्र, बालरंगभूमीची चळवळ दुर्दैवाने आजही काही मोजक्‍याच शहरांमध्ये बघायला मिळते. ही चळवळ तळागाळापर्यंत पोचण्यासाठी शालेय रंगभूमीचा वाटा महत्त्वाचा आहे. त्यासाठी बालनाट्य चळवळ एक शैक्षणिक आणि सामाजिक चळवळ झाली पाहिजे, असे मत दुसऱ्या बालनाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कांचन सोनटक्के यांनी व्यक्त केले. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या दुसऱ्या बालनाट्य संमेलनाचे उद्‌घाटन शुक्रवारी बालनाट्यकलाकार सोहम पिंगळीकर याच्या हस्ते झाले. या वेळी परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, महापौर शैलजा स्वामी, आमदार डी. पी. सावंत, वसंतराव चव्हाण, हेमंत पाटील, अमर राजूरकर, ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सोनटक्के उपस्थित होते. 

सोनटक्के म्हणाल्या, की अलीकडे जास्तीत जास्त मुले इंग्रजी माध्यमातून शिकत असल्यामुळे त्यांना मराठी नाटकांमधील गमती-जमतींचा आस्वाद घेता येत नाही. मग व्यावसायिक मराठी बालरंगभूमीचे भवितव्य काय, का व्यावसायिक मराठी बालरंगभूमीची गरज उरली नाही, अशा प्रश्‍नांनी अस्वस्थ वाटत आहे. 

बालनाट्य संमेलनाला सरकारचे पाठबळ मिळायला हवे. या संदर्भात मार्च महिन्यात सरकारने एक बैठक बोलावली असून, पुढील नाट्यसंमेलनाला 25 लाख रुपये सरकारकडून निश्‍चितच मिळतील, असा विश्‍वास जोशी यांनी व्यक्त केला. 

शालेय विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता 
बालनाट्य चळवळीला, मुलांमधील अभिनय कौशल्य विकसित व्हावे, त्यांना एक व्यासपीठ मिळावे, या हेतूने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे दुसरे बालनाट्य संमेलन नांदेडमध्ये आजपासून सुरू झाले. शहरातील एकूण सहा रंगमंचांवर नाटकांचे सादरीकरण होत आहे. "नाट्यछटा' उपक्रमातून शहरातील प्रत्येक शाळेमध्ये संमेलनाची वातावरणनिर्मिती करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाटक बघण्यासाठी उत्सुकता होती. प्रत्येक नाटकाला विद्यार्थी टाळ्यांच्या कडकडाटासह प्रोत्साहन देत होते. 

Web Title: The inaugural meeting of the balanatya in Nanded