हिंगोलीत रिसाला, पेन्शनपुरा भागात उभारलया पोलिस चौकी, निसार तांबोळी यांच्या हस्ते उद्‍घाटन 

राजेश दारव्हेकर 
Tuesday, 5 January 2021

हिंगोली शहरातील पेन्शनपुरा येथील सार्वजनिक प्रयत्नातून नव्याने उभारलेल्या पोलिस चौकीचे उद्‍घाटन मंगळवारी (ता.पाच) नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले. 

हिंगोली : शहरातील पेन्शनपुरा येथील सार्वजनिक प्रयत्नातून नव्याने उभारलेल्या पोलिस चौकीचे उद्‍घाटन मंगळवारी (ता.पाच) नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्यासह उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, नगरसेवक शेख निहाल भैया, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, नगरसेवक अनिल नेनवाणी, शेख शकील, जावेदराज, सुरेश अप्पा सराफ आदींची उपस्थिती होती. 

पेन्शनपुरा भाग हा अतिसंवेदनशील असल्या कारणाने याठिकाणी नेहमीच काहींना काही अनुसूचित घटना घडत असतात. त्यामुळे या ठिकाणी पोलिस चौकी उभारण्यात यावी यासाठी नगरसेवकांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यानुसार या ठिकाणी पोलिस चौकी उभारण्यात आल्याने या चौकीचे उद्‍घाटन झाले. यासह रिसाला बाजार येथेही पोलिस चौकीचे उद्‍घाटन झाले तर ग्रामीण पोलिस ठाण्यातील उद्यानाचे उद्‍घाटन श्री.तांबोळी यांच्या हस्ते झाले. 

हेही वाचा - सरत्या वर्षात परभणी पोलिसांची चमकदार कामगिरी ; अनेक गुन्हे 100 टक्के उघडकीस, प्रतिबंधात्मक कारवाई देखील यशस्वी

औंढा पोलिस स्टेशनची तपासणी 
औंढा नागनाथ : जिल्‍हा वार्षिक तपासणी अंतर्गत नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी मंगळवारी औंढा नागनाथ पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी केली. या वेळी पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे उपस्थित होते. पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी प्रलंबित गुन्हे, दप्तर तपासणी करुन ठाण्याच्या परिसराची पाहणी केली. त्याप्रमाणे विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनांची तपासणी करून ही वाहने लिलावात काढण्याच्या सूचना दिल्या. पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी पोलिस कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली, तसेच पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुठल्याही अडीअडचणी असेल तर मला सांगा असे सांगितले. या वेळी पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, पोलिस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे उपस्थित होते. 

हेही वाचा - दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर दृष्टीहीन लताने सर केलं कळसुबाई शिखर

रिसाला भागात पोलिस चौकीचे उद्‍घाटन 
शहरातील हिंगोली - अकोला रस्त्यावर असलेल्या रिसाला बाजार येथे सार्वजनिक पुढाकारातून नव्याने उभारलेल्या पोलिस चौकीचे उदघाटन मंगळवारी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी व्यापारी महासंघाचे कार्यध्यक्ष रमेशचंद्र बगडीया, बिरजू यादव, जहिरभाई इटवाले आदींची उपस्थिती होती. रिसाला भाग हा अतिसंवेदनशील असल्या कारणाने याठिकाणी नेहमीच काहींना काही वाद होऊन हाणामारीचे प्रकार घडत असतात. दोन दिवसांपूर्वी दोन गटात वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे या ठिकाणी पोलिस चौकी उभारण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. त्यामुळे मंगळवारी निसार तांबोळी यांच्या हस्ते पोलिस चौकीचे उद्‍घाटन करण्यात आले. त्यानंतर तांबोळी यांनी उपविभागीय पोलिस कार्यालयात जाऊन पाहणी केली.  

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inauguration of police chouki by Nisar Tamboli at Risala, Pensionpura area, Hingoli News