लोकनेते गाेपीनाथ मुंडेंच्या वरळी कार्यालयाचे उद्‌घाटन लांबणीवर, पंकजा मुंडेंची माहिती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे वरळी (मुंबई) येथील कार्यालय पाच फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होणार आहे. सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या आग्रहाने ही तारीख पुढे ढकलल्याची माहिती माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकात दिली आहे.

बीड - लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे वरळी (मुंबई) येथील कार्यालय पुन्हा सुरू करण्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी केली होती. 26 जानेवारीला उद्‌घाटन होणार होते; परंतु आता उद्‌घाटन पाच फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. 

12 डिसेंबरला परळीजवळील गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी भाजप सुकाणू समिती सोडत असून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार 26 जानेवारीला मुंबईतील कार्यालयाचे उद्‌घाटन करून 27 जानेवारीला औरंगाबादला उपोषण करण्याचेही त्यांनी जाहीर केले होते.

हेही वाचा - आंतरराष्ट्रीय गाजलेले चित्रपट पाहायचेत? चला औरंगाबादला! 

वरळीच्या शुभदा बिल्डिंगमधील कार्यालय 26 जानेवारीला पुन्हा सुरू करण्यात येणार होते; परंतु सरपंच, जिल्हा परिषदेचे सदस्य, लोकप्रतिनिधी व सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाने ही तारीख पुढे ढकलल्याचे पंकजा मुंडे यांनी पत्रकात म्हटले आहे. आता हे उद्‌घाटन पाच फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता होणार आहे. 

हेही वाचा - सत्तेतल्या नेत्यांनो, वायफळ बडबड करू नका

27 जानेवारीचे उपोषण होणार का? 
दरम्यान, जयंतीदिनीच पंकजा मुंडे यांनी 27 जानेवारीला औरंगाबादला उपोषण करणार असल्याचे जाहीर केले होते. उपोषणाच्या आदल्या दिवशी कार्यालयाचे उद्‌घाटन आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून उपोषण केले जाणार होते. कार्यालयाचे उद्‌घाटन लांबल्यामुळे आता उपोषण 27 तारखेला होणार का, त्याची तारीखही पुढे ढकलणार? याकडे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inauguration of The Worli Office Of Gapinath Munde