सहा करपात्र धर्मादाय संस्थांकडून 20 कोटींची वसुली

प्रकाश बनकर
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

2015-16 मध्ये धर्मादाय संस्थांसाठी प्राप्तिकर विभागाने स्वतंत्र संचालनालयाची स्थापना केली आहे. यासाठी औरंगाबाद विभागात अतिरिक्‍त प्राप्तिकर आयुक्‍तांची नियुक्‍ती करण्यात आली असून, त्यांच्या अधिपत्याखाली मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह नगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार अशा 11 जिल्ह्यांचे कामकाज चालते.

औरंगाबाद : प्राप्तिकर विभागाला गेल्या चार महिन्यांत बीड, जालना, औरंगाबाद, परभणी आणि नगर येथील सहा धर्मादाय संस्थांच्या (चॅरिटेबल ट्रस्ट) 125 कोटी रुपयांच्या करपात्र उत्पन्नाचा शोध लागला आहे. या संस्थांनी 45 कोटी रुपयांचा प्राप्तिकर बुडविल्याचे स्पष्ट झाले असून, कारवाईनंतर त्यांच्याकडून 20 कोटी रुपयांचा प्राप्तिकर वसूल केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

2015-16 मध्ये धर्मादाय संस्थांसाठी प्राप्तिकर विभागाने स्वतंत्र संचालनालयाची स्थापना केली आहे. यासाठी औरंगाबाद विभागात अतिरिक्‍त प्राप्तिकर आयुक्‍तांची नियुक्‍ती करण्यात आली असून, त्यांच्या अधिपत्याखाली मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह नगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार अशा 11 जिल्ह्यांचे कामकाज चालते. या सहा संस्थांपैकी एका ट्रस्टकडे 70 कोटी रुपये करपात्र उत्पन्न सापडले आहे.

या कारवाईनंतर आता प्राप्तिकर विभागाने आपला मोर्चा धर्मादाय रुग्णालये, शिक्षण संस्थांच्या कारभारावर संचालनालयाची करडी नजर ठेवली आहे. गेल्या चार महिन्यांत सहा धर्मादाय संस्थांवर कारवाई करून 125 कोटी रुपयांचे करपात्र उत्पन्न शोधण्यात संचालनालयाला यश आले आहे. या उत्पन्नावर 45 कोटी रुपयांचा प्राप्तिकर मिळणे अपेक्षित असून, धर्मादाय संस्थांनी आतापर्यंत 20 कोटी रुपयांचा भरणा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Web Title: income tax department in Aurangabad