कोरोनाने पित्याला गिळले, रुग्णालयाने मातेला छळले

जालना : रुग्णवाहिकेत ताटकळलेली कोरोनाबाधित महिला.
जालना : रुग्णवाहिकेत ताटकळलेली कोरोनाबाधित महिला.

जालना -  कोरोनामुळे शनिवारी (ता.१८) सकाळी वडीलांचे निधन झाले. हे दुःख बाजूला सारून कोरोनाबाधित आईला उपचार मिळावेत यासाठी एका मुलाची दिवसभर परवड झाली. जनआरोग्य योजनेत समावेश असूनही एका खासगी रूग्णालयाने ॲडव्हान्स रक्कम भरल्याशिवाय दाखल करून घेण्यास नकारच दिल्याने कोरोनाबाधित माता दोनतासांपेक्षा अधिक काळ रूग्णवाहिकेतच ताटकळली. शेवटी प्रशासनाच्या मदतीने दुसऱ्या खासगी रूग्णालयात कोरोनाबाधित मातेला दाखल करावे लागले. दरम्यान या प्रकरणी जिल्हाधकारी रवींद्र बिनवडे यांनी चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत. 

महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत शहरातील अकरा खासगी रूग्णालयांचा समावेश आहे. प्रशासनाने तेथे कोरोना बाधित रूग्णावर उपचार करण्याचे आदेश दिलेले आहेत. शिवाय तेथे ८० टक्के खाटा कोरोना बाधित रूग्णासाठी राखीव ठेवण्याचेही निर्देश आहेत. या रूग्णालयांनी रूग्ण दाखल करताना अगोदर पैसे मागू नये, असे स्पष्ट निर्देशही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी दिलेले आहेत. असे असतानाही काही खासगी रूग्णालयाचा मनमानी कारभार सुरूच असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, शहरातील एकाच्या वडिलाचा शनिवारी सकाळी जिल्हा सामान्य रूग्णालय येथे कोरोनामृत्यू झाला. त्यातच आईही कोरोनाबाधित आढळली. त्यामुळे बाधित आईला उपचारासाठी मुलगा जनआरोग्य योजनेअंतर्गत असलेल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णवाहिकेतून घेऊन गेला. मात्र, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रूग्णाला दाखल करून घेतले जाऊ शकत नाही, तसेच दाखल करण्यापूर्वी दहा हजार रुपये भरा अशी अडवणूक करण्यात आल्याचे मुलाने सांगितले. या सर्वप्रकारात दोन तासांहून अधिककाळ कोरोनाबाधित माता रूग्णवाहिकेत झोपून होती. दरम्यान, या प्रकाराची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली.

अधिकाऱ्यांनी मुलास जिल्हा सामान्य रूग्णालयात कोरोनाबाधित मातेला घेउन येण्यास सांगितले. मात्र नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात उपचार करण्याबाबत भूमिका घेतली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या मदतीने शहरातील दुसऱ्या खासगी रुग्णालयात बाधित मातेला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, या सर्व गडबडीत या कोरोना बाधित महिला रूग्णाची हेळसांड झाली. याबाबत माहिती मिळताच जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी तत्काळ दखल घेतली. अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, तसेच चौकशीचे आदेश दिले आहेत. 

कोरोना बाधित महिलेला दाखल करून घेण्यापूर्वी एका खासगी हॉस्पिटल पैशांची मागणी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या जिल्हा समन्वकांना चौकशीसह अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीअंती रुग्णालय दोषी आढळून आल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. कोरोना बाधित रूग्णाच्या नातेवाईकांकडून अगोदर पैसे घेऊ नये, असे स्पष्ट आदेश यापूर्वीच आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेले आहेत. 
-रवींद्र बिनवडे, 
जिल्हाधिकारी, जालना. 

(संपादन : संजय कुलकर्णी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com