लातूर : धूलिकण वाढल्याने हवेची गुणवत्ता ढासळली

सुशांत सांगवे 
Sunday, 17 November 2019

लातूर शहरातील वातावरणात गेल्या काही महिन्यांत धुलिकणांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे.

लातूर : शहरातील वातावरणात गेल्या काही महिन्यांत धुलिकणांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. लातूरकर प्रत्येक श्वासातून धूळ फुफ्फूसात घेत आहेत; पण धुळीचे प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनातर्फे कुठलीही पावले उचलली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच हवेची गुणवत्ता ढासाळली असून, ती आता धोक्याच्या पातळीपर्यंत पोचली असल्याचा धक्कादायक अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे लातूरकरांनी आपल्या आरोग्याबाबत अधिक दक्ष राहणे गरजेचे बनले आहे.

दिल्लीतील प्रदुषणाची चर्चा सध्या देशात सर्वत्र सुरू आहे. पण कमी-अधिक प्रमाणात वाढत्या प्रदुषणाला महाराष्ट्रातील नागरिकांनाही तोंड द्यावे लागत आहे. लातूरमध्येही वेगवेगळ्या कारणांमुळे सुक्ष्म आणि अतिसुक्ष्म धुलिकणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाशी संबंधीत वेगवेगळ्या आजाराशी सामना करावा लागत आहे. वातावरणातील धुळीचे प्रमाण कमी होत नसल्याने काहींनी तर रुमाल, मास्क बांधून प्रवास करायला सुरवात केली आहे, असे चित्र शहरात आता सहज पहायला मिळत आहे.

तीन ठिकाणी होते हवेची तपासणी- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गंजगोलाई (व्यापारी भाग), केशवराज विद्यालय (रहिवासी भाग) आणि एमआयडीसी वॉटर वर्क (औद्योगिक भाग) या भागात वातावरणातील हवेचे नमूने घेण्यासाठी हाय व्हॅल्यूम सॅम्पलर ही यंत्रणा कार्यरत आहे. मंडळाने दयानंद महाविद्यालयाला या प्रकल्पात सहभागी करून घेत तीनही ठिकाणचे वातावरणातील हवेचे नमूने प्रत्येक आठवड्याला जमा करायचे, असे सांगितले आहे. त्यानूसार जमा झालेल्या हवेच्या नमून्यांवरून शहरात धूलिकणाचे प्रमाण वाढले आहे. काही भागात १०० (आरएसपीएम) युनिटची पातळी ओलांडली असल्याचे निष्पण्ण झाले आहे.

मंडळाचे महापालिकेला पत्र- शहरातील वातावरणात धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्य कार्यालयाने लातूर महापालिकेला पत्र पाठवून योग्य त्या दक्षता घेण्याच्या सूचना नुकत्याच केल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी व्ही. पी. शेळके यांनी  ‘सकाळ’ला दिली. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून योग्य ती खबरदारी घ्यायला हवी, असेही ते म्हणाले.

प्रदुषणाची प्रमुख कारणे-

रस्त्यांवरील खड्‌डे, त्यात टाकले जाणारे मुरूम
रस्त्यांवरील अस्वच्छता, दररोज सफाई न होणे
बांधकामाच्या ठिकाणी ग्रिन नेटचा अभाव
रस्त्याकडेला कचरा जाळणे
दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या

वाहने, कारखाने, कचरा जाळणे अशा वेगवेगळ्या माध्यमातून पसरणारा धुर आणि रस्त्यावरील धूळ यामुळे शहरात प्रदुषणाची पातळी वाढत आहे. याचा परिणाम थेट श्वसनविकारावर होत आहे. या आजाराचे रुग्ण सध्या वाढत आहेत. वाढत्या प्रदुषणामुळे दमा, दुर्धर दमा, फुफ्फूसाचा कर्करोग, त्वचेचे आजार, त्वचेचा कर्करोग अशा आजारांना सामोरे जावे लागते. ते टाळण्यासाठी प्रत्येकाने स्वत:ची योग्य ती काळजी घ्यावी. चेहऱ्याला मास्क बांधावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, घराच्या परिसरात झाडे लावावीत, धूर सोडणारी जूनी वाहने वापरू नयेत, रस्त्यांची स्वच्छता वेळेवर व्हावी, खड्डे बजूवले जावेत अशा उपाययोजना गरजेच्या आहेत.
- डॉ. रमेश भराटे, श्वसनविकार तज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The increase in dust caused the air quality to decline