संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

कशाला मिसकॉल करतोय... 

कुंभार पिंपळगाव (जि. जालना) -  विविध मोबाईल नेटवर्क सेवा कंपन्यांनी रिचार्जच्या दरात घसघशीत वाढ केली आहे. यामुळे ग्रामीण भागात दिवसभर ऑनलाइन राहणारे मोबाईलधारक आता चक्क ऑफलाइन दिसत आहेत. तर काही जणांनी आता पुन्हा मिसकॉलची पद्धत सुरू केली आहे. कितीतरी दिवसांनंतर "कशाला मिसकॉल मारतोस' या गाण्याची आणि संवादाची जणू रोज आठवण येत आहे.    

विविध मोबाईल नेटवर्क सेवा कंपन्यांनी रिचार्जच्या दरात 40 ते 50 टक्के वाढ केली आहे. यामुळे सर्वसामान्य माणसाला चटक लागलेला मोबाईल वापरणे अवघड होत आहे. कंपन्यांनी वेगवेगळ्या आकर्षक ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षित करून ऑनलाइनची भुरळ टाकली. काही कंपन्यांनी दोन जीबीपर्यंतचा डाटा अगदी फुकट दिला. फ्री डाटा मिळत असल्यामुळे अगदी सुशिक्षित लोकांपासून ते युवक, युवती, गृहिणी ते गुराख्यापर्यंत ऑनलाइनची पद्धत सुरू झाली. घराघरांत एककडे दोनपेक्षा जास्त सीमकार्ड राहू लागले. एखाद्या कंपनीची रेंज गेली की दुसरे कार्ड उपयोगी येऊ लागले, तर तीन-चार सीमचेही मोबाईल आले यामुळे चोवीस तास लोक रेंजमध्ये राहू लागले; मात्र कंपन्यांनी मोबाईलधारकांचा हा आनंद जास्त काळ टिकू दिला नाही.

सर्वसामान्यांच्या खिशाला झळ
प्रत्येक 28 दिवसांना 35 रुपयांचे रिचार्ज अनिवार्य केले. शिवाय काही दिवसांची मुदत ठेवीत इनकमिंग बंद केली. यामुळे पहिल्या झटक्‍यात बहुतांश लोकांचे दोन-दोन कार्ड बंद पडले. त्यानंतर तीन डिसेंबरपासून सर्वच मोबाईल कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या दरात 40 ते 50 टक्के वाढ केली. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला जणू झळ पोचू लागली. यामुळे हळूहळू एक-एक कार्ड बंद करीत एका सीमवर आले. फ्री कॉल, एक पैसा कॉल, दहा पैसे कॉल, तीस पैसे कॉल बंद होऊन चक्क दोन रुपयांना एक कॉल झाला. मोबाईल कंपनीच्या या प्रचंड वाढीमुळे ऑनलाइन असलेले लोक आता ऑफलाइन दिसू लागले, तर खेड्यापाड्यांत पुन्हा मिसकॉलची पद्धत सुरू झाली आणि पुन्हा ओठांतून शब्द बाहेर पडू लागले, "कशाला मिसकॉल करतोस...' 

भाजी काय केलीय 
ग्रामीण भागात तर घरोघरी मोबाईल फोन झाले. फ्री कॉलच्या स्किम असल्याने महिला परस्परांना स्वयंपाकापासून ते भाजी काय केली, जेवण झाले का अशी विचारपूस करीत होत्या. कंपनी टू कंपनी फ्री असल्याने बोलण्याला मर्यादा नव्हती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com