...तर भारतही लवकरच कोरोनामुक्त होईल ! कोण म्हणाले वाचा

जगन्नाथ पुरी
Friday, 17 April 2020

भारत देश कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजला पोचलेला आहे. अशा परिस्थितीत कोरोनाशी कसा लढा द्यायचा यासाठी दक्षिण कोरियाचे अनुकरण केले तर आपण यशस्वीपणे बाहेर पडू, असा विश्वास कोरिया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी डेजॉन, साऊथ कोरीया येथे कार्यरत असलेले संशोधक व सेनगाव येथील सचिन शितळे यांनी व्यक्त केला 

सेनगाव (जि. हिंगोली) :  चीन, अमेरिका, युरोप, इंग्लंड व जगभरातील जवळ जवळ सर्वच देश कोरोनाच्या विळख्यात अडकलेले असताना दक्षिण कोरियाने मात्र यातून आपली सुटका अगदी यशस्वीपणे करून घेतली आहे. भारत देश कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजला पोचलेला आहे. अशा परिस्थितीत कोरोनाशी कसा लढा द्यायचा यासाठी दक्षिण कोरियाचे अनुकरण केले तर आपण यशस्वीपणे बाहेर पडू, असा विश्वास कोरिया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी डेजॉन, साऊथ कोरीया येथे कार्यरत असलेले संशोधक व सेनगाव येथील सचिन शितळे यांनी व्यक्त केला आहे.

चीननंतर दक्षिण कोरिया हे पहिले असे राष्ट्र होते जेथे कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वात अधिक झाला होता. २० जानेवारीला दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंंतर २१ फेब्रुवारीपर्यंत ३४६ इतकी मर्यादित राहिली. मात्र, यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये अचानक वाढ झाली. यातून हा कम्युनिटी स्प्रेड आहे, असा त्यांनी अनुमान मांडला. 

हेही वाचालॉकडाऊन : चक्क नवरीलाच नवरदेवाने आणले दुचाकीवरून घरी

प्रतिबंधात्मक पावले उचलली

(ता.२९) फेब्रुवारीला एकाच दिवशी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ९०९ इतका झाला. आता हा आकडा येणाऱ्या काही दिवसांत खूप वाढेल म्हणून त्यांनी प्रतिबंधात्मक पावले उचलली. त्यामुळे १५ एप्रिलपर्यंत दहा हजार ५९१ इतका मर्यादित ठेवण्यात यश आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मृतांचा आकडा फक्त २२५ इतकाच आहे.

आयसोलेशन वार्डची उभारणी

दक्षिण कोरियात कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याचे लक्षात आल्याने दक्षिण कोरिया सरकारने तातडीने पावले उचलून कंपन्यांना कोरोना टेस्टिंग किटचे उत्पादन वाढविण्याचे आदेश दिले. त्यानंतर ६५० टेस्टिंग सेंटरची उभारणी केली. तसेच सरकारी व खासगी हॉस्पिटलमध्ये वेगळ्या कोरोना आयसोलेशन वार्डची उभारणी करण्यात आली.

ड्राइव्ह थ्रू टेस्ट यासारख्या सुविधा

 थ्री टी (ट्रेस, टेस्ट, ट्रीट) या फार्मुल्यावर भर दिला. जेथे मोठे राष्ट्र दर दिवशी खूप कमी टेस्टिंग करत होते, तेथे दक्षिण कोरियाने दर दिवशी १५-२० हजार सॅम्पल टेस्ट केले. याखेरीज दक्षिण कोरियाने ड्राइव्ह थ्रू टेस्ट यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. यामध्ये कोरोनाबाधित मनुष्य कोणाच्याही संपर्कात न जाता त्या केंद्रापर्यंत स्वतः ड्राईव्ह करत जाऊन गाडीतून न उतरता सॅम्पल देऊन येणार.

प्रत्येक व्यक्तीला दोन मास्क

 त्याला त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशीच त्याचा रिपोर्ट भेटणार, अशी सोय करून ठेवली. यामध्ये आणखीन एक बाब म्हणजे जो रुग्ण रुग्णालयामध्ये पॉझिटिव्ह म्हणून दाखल होता त्याची चार आठवडे सुटकाच केली नाही. मास्कचा तुटवडा पडू नये म्हणून प्रत्येक आठवड्याला प्रत्येक व्यक्तीला दोन मास्क सरकारतर्फे मोफत देण्यात आले. याबरोबरच सरकारने सॅनिटायझरचा तुटवडा पडू दिला नाही.

नागरिकांची तातडीने तपासणी

कोरोना झालेल्या व क्वारंटाइन रुग्णांच्या मोबाइलचे लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज तसेच डेबिट व क्रेडिट कार्डचा वापर कुठे व किती वेळा केला या सर्व बाबींचा अभ्यास करून त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांची तातडीने तपासणी करून घेतली.इकुठल्याही प्रकारचा लॉकडाउन न करता दक्षिण कोरियाने यशस्वीपणे कोरोनाशी लढा दिला. 

येथे क्लिक करा - हिंगोलीत पाच रेशन दुकानदारांवर कारवाई

मास्कचा, सॅनिटायझरचा वापर

यामध्ये सरकारचे यश जरी असले तरी लोकांचा सहभागही खूप मोठी बाब आहे. दक्षिण कोरियातील देगू नावाच्या शहरात सर्वात जास्त म्हणजे ७० टक्‍के प्रादुर्भाव झाला होता. तेथील नागरिकांनी प्रवास टाळून घरीच राहण्यास प्राधान्य दिले. जागरूकता दाखवत वारंवार हात धुणे, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर यावर भर दिला. 

विजय निश्चित होईल

सर्वात महत्त्वाचे सोशल डिस्टन्सिंगबद्दल विशेष काळजी घेतली. आता हे शहर जवळजवळ कोरोनामुक्त झाले आहे. भारतवासीयांनीदेखील भारत सरकारने नेमून दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले व स्वतःला सोशल डिस्टन्सिंगचे नियम घालून घेतले तर कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपलादेखील विजय निश्चित होईल, असे मत संशोधक सचिन चितळे यांनी व्यक्त केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ... India will soon be free of corona! Read who said Hingoli news