अग्निवीर म्हणाले, ‘अन्नदाता सुखी भव’!

स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार : दररोज हजारोंना भोजन हे आमचे भाग्यच
Indian Army Agniveer
Indian Army Agniveer

औरंगाबाद : अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू झाली आणि देशसेवेचे मोठे स्वप्न उराशी बाळगून विविध भागातील, कित्येक किलोमीटर प्रवास करून हजारोंच्या संख्येने उमेदवार येथे दाखल झाले. त्यांच्या राहण्यासह खाण्यापिण्याची हेळसांड झाली. याबाबतचे वृत्त माध्यमांतून प्रसिद्ध होताच ‘काहीतरी करावे’ या उद्देशाने काही समाजसेवी संस्था सरसावल्या. त्यांनी अन्नदानाचा निर्णय घेतला. संस्था, दानशूरांनी दररोज सहा हजार उमेदवारांना भोजन दिले.

देशाची सेवा करण्यासाठी पुढे आलेल्यांना अन्न देणे हे आमचे भाग्य आहे, अशी भावना स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केली तर ‘अन्नदाता सुखी भव’ असे म्हणत ही तरुणाई दात्यांप्रती समाधान व्यक्त करीत आहे. अग्निवीर योजनेअंतर्गत १३ ऑगस्टपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर विविध पदांसाठी भरती सुरू होती. त्यासाठी औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी आदी जिल्ह्यांतील सुमारे ८६ हजार तरुणांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. यातील दररोज सहा हजार तरुणांची मैदानी चाचणी घेतली गेली.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर दाखल झालेल्या उमेदवारांना विद्यापीठ परिसरात जेवणाची व्यवस्था, अन्य काही सुविधा नसल्याचे पुढे आले. याबाबतचे वृत्त माध्यमांतून येताच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आवाहनाने जिल्ह्यातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी भोजनाची व्यवस्था केली. जायंट्स ग्रुप ऑफ औरंगाबाद प्राइड, सुदर्शन महाराज, जयमलसिंग रंधवा, असलम खान, दानिश खान, ग्रामविकास संस्थेचे अब्दुल सलीम पठाण, वैभव सोनवणे, ऑल हिंद मल्टी पर्पज सोसायटीचे मुसा शेख आदींनी उमेदवारांसाठी २८ ऑगस्टपर्यंत जेवणाची व्यवस्था केली. यासाठी रोज एक संस्था, व्यक्ती याप्रमाणे अन्नदानाचे नियोजन केले होते.

दाता-भोक्ता दोघेही संतुष्ट

  • अन्न ही अत्यावश्यक बाब

  • अन्नामुळेच शरीराचे बल वाढते

  • गरीब असो वा श्रीमंत, सर्वांची धडपड टीचभर पोटासाठीच असते

  • अन्नदान करणारा जणू प्राणदान करणारा असतो

  • अन्नदानामुळे दाता-भोक्ता असे दोघेही संतुष्ट होतात

अन्नदान श्रेष्ठदान!

विविध दानांमध्ये अन्नदान श्रेष्ठ मानले जाते. पूर्वी खेडोपाडी काही दानशूरांच्या घरी जेवणाच्या पंगती उठत असे. भोजन करणाऱ्यांकडून ‘अन्नदाता सुखी भव’ असा आशीर्वाद मिळे. अन्नदानाची नावे वेगवेगळी असली तरी मराठवाड्यात विविध धार्मिक किंवा अन्य मोठ्या उत्सवांतही असे उपक्रम सातत्याने राबविले जातात. अनेक धार्मिक स्थळेही यात पुढे आहेत.

अग्निवीर योजने अंतर्गत दाखल झालेल्यांपैकी अनेक जण भविष्यात देशसेवा करणार आहेत. त्यांना अन्न पुरविण्याची मिळालेली संधी हे आमचे भाग्यच.

-जमलसिंग रंधवा

अग्नीवीर योजनेला सुरवातीला देशात ठिकठिकाणी काहीसा विरोध पहायला मिळाला. औरंगाबादेत मात्र भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर आलेल्या युवकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांना जेवण देण्याची भूमिका घेतली.

- दानीश खान

सैन्य भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्यांना प्रोत्साहित करायला हवे. ‘अग्निवीर’साठी औरंगाबादेत आलेल्यांसाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनी अन्नदानासह अन्य काही सुविधा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ही स्तुत्य बाब आहे.

- सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com