‘महागामी’द्वारे विदेशातही गेली भारतीय नृत्यशैली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

पुरातन काळापासून चालत आलेली भारतीय गुरुकुल आणि गुरू-शिष्य परंपरा आता लोप पावत चालल्याची चर्चा होत असली तरी औरंगाबादमधील ‘महात्मा गांधी मिशनच्या महागामी गुरुकुल’ ही संस्था गेल्या वीस वर्षांपासून ही परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे, या परंपरेचा प्रचार, प्रसार करण्याचे कार्य करीत आहे. पाश्‍चात्य संस्कृतीचा भडिमार होत असताना ‘महागामी’ने आपले वेगळेपण जपत भारतीय नृत्यशैलीचा वारसा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचविला आहे. ‘महागामी’च्या या परंपरेने मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला असून या संस्थेत शिक्षण घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी आपल्या प्रांतात गुरू-शिष्य परंपरा सुरू केली आहे.

‘महात्मा गांधी मिशन’ (एमजीएम) संस्थेत १९९६ मध्ये ‘महागामी’स सुरवात झाली. ऑगस्ट १९९९ मध्ये बिरजू महाराज यांच्या हस्ते, ‘एमजीएम’चे सचिव अंकुशराव कदम, पद्मश्री शंकरबापू आपेगावकर, पार्वती दत्ता यांच्या उपस्थितीत ‘महागामी’च्या डान्स स्टुडिओचे भूमिपूजन झाले.

‘महागामी’मध्ये कथ्थक आणि ओडिसी नृत्याचे शिक्षण दिले जाते. या संस्थेच्या माध्यमातून नृत्याची संस्कृती जगासमोर आणण्याच्या उद्देशाने पार्वती दत्ता दिल्लीहून औरंगाबादेत आल्या. आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नृत्य कलाकार असलेल्या दत्ता यांनी ‘महागामी’च्या संचालकपदाची धुरा स्वीकारली. पहिली दहा वर्षे संघर्ष केला. त्यानंतर हळुहळु या संस्थेचा विस्तार झाला. त्या, तसेच संस्थेच्या कलावंतांनी आतापर्यंत चाळीसहून अधिक देशांचा दौरा करीत औरंगाबादच्या नृत्यकलेचा वारसा जगभर पोचविला. ‘महागामी’त सध्या गुरू-शिष्य परंपरेतील तिसरी पिढी शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे विदेशातील सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी या संस्थेत शास्त्रीय नृत्याचे धडे घेतले आहेत. हे विद्यार्थी आपल्या देशात या परंपरेचा विस्तार करीत आहेत. 

‘महागामी’तर्फे वर्षभरात तीनशेहून अधिक वेगवेगळे कार्यक्रम होतात, प्रशिक्षण होते. त्यातील तीन ते चार कार्यक्रम विदेशात असतात. या कार्यक्रमांच्या माध्यमातून विदेशात भारतीय शास्त्रीय नृत्याचा प्रचार आणि त्यांचे महत्व पटवून दिले जाते. ‘महागामी’चा ‘शारंगदेव महोत्सव’ हा आंतरराष्ट्रीय धर्तीवर भरविला जातो. शास्त्रीय नृत्यातील दिग्गजांनी या महोत्सवात हजेरी लावली आहे. त्याशिवाय गेल्या चार वर्षांपासून विदेशी पर्यटकांसाठी ‘ऑरा-औरंगाबाद’ हा शास्त्रीय नृत्यशृंखलेचा कार्यक्रम घेतला जातो. त्यात भरतनाट्य, कथ्थक, ओडिसी नृत्याचे सादरीकरण केले जाते. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक शिक्षणाच्या जोरावर जगभर पोचलेले गुरुकुल म्हणून ‘महागामी’ने लौकिक मिळविला आहे. तो मराठवाड्यासाठी अभिमानास्पद असाच आहे.

सातासमुद्रापार पोचली परंपरा
‘महागामी’तून देण्यात येणाऱ्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दखल जगभर घेतली जात आहे. अर्जेंटिना, मेक्‍सिको आणि ब्राझील येथील प्रत्येकी एका विद्यार्थ्याने ‘महागामी’त शिक्षण घेऊन आपल्या देशात गुरू-शिष्य परंपरा सुरू केली आहे. आपल्या देशात हे विद्यार्थी भारतीय शिक्षणाचे धडे देत प्रचार-प्रसार करीत आहेत. जगभरात होणाऱ्या मानाच्या महोत्सवांमध्ये ‘महागामी’ला सन्मानाने आमंत्रित करण्यात येते.

Web Title: indian dance art go to foreign by mahagami organisation